मुंबई/दि. ७ – मुंबई उच्च न्यायालयाने ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा राज्य सरकारचा आदेश शुक्रवारी रद्द ठरवला. ६५ वर्षावरील कलाकार, टेक्निशियन आणि संबंधितांना कामाची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या विस्तारामुळे महाराष्ट्र सरकारने शूqटग संबंधी काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. त्यात ६५ वर्षांवरील कलाकारांना काळजी म्हणून शूटिंग करण्यास बंदी घातली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या मार्गदर्शक सूचनांत बदल करून ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी दिली आहे. राज्य सरकार एका ज्येष्ठ नागरिकाला आपले दुकान उघडण्यास आणि दिवसभर बसण्यापासून रोखत नसेल, तर सध्याच्या टाळेबंदीमध्ये ते कोणत्या आधारावर ६५ वर्षांवरील वयाच्या कलाकारांना शूटिंगला येऊ देण्यास थांबवत आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. महाराष्ट्र सरकारने काही अटी घालून शूटिंगला परवानगी दिली होती; मात्र ६५ वर्षांवरील कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक, तसेच कोणत्याही क्रिएटिव्ह व्यक्तीला शूटिंगसाठी सेटवर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. यानंतर या मुद्द्यावरून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ कलाकार शूटिंगच्या सेटवर नसतील, तर काम पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांत बदल करावा, अशी मागणी करण्यात आली होती; मात्र महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना असल्याचे सांगून याप्रकरणातून अंग झटकले होते. प्रोड्यूसर फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा सरकारचा निर्णय रद्द ठरवला आहे. ६५ वर्षावरील कलाकार, तंत्रज्ञ आणि संबंधितांना कामाची परवानगी देण्यात आली आहे.
सरकारी सूचनांत भेदभाव
शारीरिकदृष्ट्या निरोगी, ६५ वर्षांहून अधिक वयाच्या कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा आणि अशाप्रकारच्या कामांसाठी बाहेर जाण्यापासून रोखण्याचा राज्याचा निर्णय हा भेदभाव आहे. अशी बंदी कोणत्या आधारावर लागू केली गेली आहे, हे स्पष्ट करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले होते.