मराठी

अंदमान, निकोबार बेटावर हायस्पीड इंटरनेट

१,२२४ कोटी रुपये खर्च

नवी दिल्ली/दि.२० – अंदमान-निकोबार बेटे खजुराची झाडे, सुंदर पांढरे वाळू किनारे आणि उष्ण कटिबंधीय पावसासाठी तसेच जंगलांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. निसर्गाच्या मांडीवर वसलेले हे बेट सर्वांना आकर्षित करते. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अंदमान आणि निकोबारला समुद्राखालून टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचे उद्घाटन केले. ही फायबर केबल चेन्नई ते पोर्ट ब्लेअर समुद्राच्या खालून गेली आहे. पोर्ट ब्लेअर व्यतिरिक्त स्वराज बेट, लिटल अंदमान, कार निकोबार, कामारोटा, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड, रंगत, अंदमान आणि निकोबार बेटांचे ६ इतर बेटे, तसेच संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटांना हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध करून दिली जाईल. ३० डिसेंबर २०१८ रोजी मोदी यांनी चेन्नई-अंदमान निकोबार बेटे इंटरनेटशी जोडण्याच्या कामाचा प्रारंभ केला होता. या प्रकल्पांतर्गत २,३१२ किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल समुद्राखालून टाकण्यात आली आहे. यासाठी सुमारे १,२२४ कोटी रुपये खर्च झाला आहे. उद्घाटनानंतर मोदी म्हणाले, की अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये ओएफसी कनेक्टिव्हिटीमुळे या बेटांवर ४ फोर जी मोबाइल सेवांना चालना मिळेल. यामुळे टेलि – एज्युकेशन, टेलिहेल्थ, ई-गव्हर्नन्स सव्र्हिसेस आणि बेटांवरील पर्यटनासारख्या डिजिटल सेवेला प्रोत्साहन मिळेल.

अंदमान निकोबार बेटांमध्ये चांगली संपर्क यंत्रणा असल्यास लोकांचे जीवन व शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील. या प्रदेशातील चांगल्या कनेक्टिव्हिटीमुळे पर्यटन क्षेत्रात ब-याच संधी निर्माण होतील. हा प्रकल्प भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने राबविला. दूरसंचार सल्लागार इंडिया लिमिटेड (TCIL) तांत्रिक सल्लागार होते. बीएसएनएलने २४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत केबल टाकण्याचे काम केले. जागतिक वैशिष्ट्यांनुसार गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी पाण्याखालून ऑप्टिकल फायबर केबलिंगचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दहा वर्षापासून भारतात फोर जी सेवा वापरली जाते. अंदमान आणि निकोबार मात्र संपर्क सुविधेपासून दूर होते. अंदमान आणि निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशात अजूनही थ्री जी सेवा वापरत होते.

एअरटेलही वेगवान सेवा देणारी पहिली कंपनी 

वेगवान इंटरनेटचे महत्त्व लोकांना समजू लागताच, एअरटेलने चेन्नई ते अंदमान-निकोबार बेटांवर ऑप्टिकल फायबर केबल टाकल्यानंतर अल्ट्रा-फास्ट ४ जी सुरू केली. अशा प्रकारे या बेटांवर हाय स्पीड ४ जी सेवा देणारी एअरटेल पहिली खासगी टेलिकॉम ऑपरेटर बनली आहे. एअरटेल २००५ पासून अंदमानमधील लोकांना नेटवर्कशी संबंधित सेवा पुरवित आहे.

Back to top button