मराठी

काश्मीरमधील हाॅटेल्स पर्यटकांनी गजबजली

श्रीनगर/दि.१४ –  भारताचे स्वित्झर्लंड म्हटल्या जाणाऱ्या गुलमर्गच्या हॉटेल्समध्ये जागा शिल्लक नाहीत. अशीच स्थिती पहलगामचीही आहे. नोव्हेंबर मध्यात खोऱ्यात पहिल्यांदा बर्फवृष्टी झाली होती. त्यानंतर ख्रिसमस व नवीन वर्ष साजरे करण्यासाठी पर्यटक बुकिंग करत आहेत. संकटातून पर्यटन उद्योग बाहेर पडतो आहे.
काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर लावलेले प्रतिबंध आणि कोरोनाच्या दोन टाळेबंदी राज्याच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला होता; मात्र टाळेबंदी उठवल्यानंतर येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे. नोव्हेंबरमध्ये १० हजार पर्यटक आले. हॉटेल्सना कोरोना प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. काश्मीरचे पर्यटन संचालक निसार अहमद वाणी यांच्यानुसार गुलमर्गमध्ये हिवाळी खेळ सुरू झाले आहेत. स्की कोर्सही केले जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या चार आणि दुसऱ्या राज्यातील दोन गटांसाठी प्रशिक्षण सुरू होईल. दोन गट केवळ महिलांचे असतील.
हिमाचल प्रदेशात अटल टनलचे पर्यटकांना आकर्षण आहे. येथून रोज एक हजार गाड्यांची ये- जा सुरू आहे. नऊ किलोमीटर लांब अटल टनल पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे. यामुळे कुलू-मनालीतही पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली आहे. लोक तीन ते चार दिवसांचे पॅकेज करून कुलूहून रोहतांग टनलला जात आहेत. टनलमधून पर्यटक लाहौल-स्पिती जातात. त्यामुळे तेथेही पर्यटन वाढले आहे. लाहौलचे एसपी मानव वर्मा यांच्यानुसार वीकेंड आणि इतर सुटीच्या दिवशी टनलमधून सुमारे १५०० गाड्या जातात.
कोरोना महामारीमुळे राज्याच्या पर्यटन महसुलात ८५ टक्के घट झाली; मात्र डिसेंबर मध्यात पहिला हिमवर्षाव होताच पर्यटक येऊ लागले. गेल्या शनिवारी दुसरा हिमवर्षाव झाला. गढवाल मंडळ विकास परिषदेचे गेस्ट हाऊस व्यवस्थापक प्रदीप मंद्रवाल यांच्यानुसार ८० टक्के बुकिंग वाढली आहे. मसुरी- नैनितालमध्ये ऑनलाइन बुकिंग सुरू झाली आहे.

Related Articles

Back to top button