एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित
अमरावती, दि. 26 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिटीस्कॅन चाचणीच्या निश्चित दर जिल्हा प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार तपासणी केंद्रांनी दर आकारणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागामार्फत यापूर्वीदेखील कोरोना आणि इतर रुग्णांच्या तपासणीसाठी खासगी रुग्णालयांनी आकारावयाचे दर तसेच खासगी प्रयोगशाळांनी आरटीपीसीआर, रॅपीड एंटीजेन, एंटी बॉडीज चाचण्यांसाठीचे दर निश्चित केले आहेत. कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी सिटीस्कॅनसारख्या चाचणीची देखील आवश्यकता भासते. त्यासाठी खासगी रुग्णालये किंवा सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांकडून अवाजवी रक्कम आकारण्याबाबत शासनाला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शासनाने एचआरसीटी चाचण्यांचे दर निश्चित करण्याचा निर्णय घेतला. कुठेही जादा दर आकारणी होत असल्याचे प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे निर्देश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही काल झालेल्या अमरावती जिल्हा आढावा बैठकीत दिले होते.
जादा दर घेत आढळल्यास तत्काळ कारवाई करा : पालकमंत्री
आता जिल्हा प्रशासनाकडून याबाबत कमाल दर मर्यादा निश्चित करून देणारा आदेश निर्मगित करण्यात आला आहे. त्यामुळे या दरांनुसारच आकारणी होणे आवश्यक आहे. कुठेही जादा दर घेत असल्याचे आढळल्यास संबंधित यंत्रणांनी तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर (Minister Women Child Development District Guardian Minister Ed. Yashomati Thakur) यांनी दिले आहेत. ही नफा कमावण्याची वेळ नाही. आपली देश व समाजाप्रतीची जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. त्यामुळे कुणीही रूग्णांची अडवणूक करू नये, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.
एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी दरनिश्चिती : जिल्हाधिकारी श्री. नवाल
कोरोनाबाधित रूग्णाला विविध प्रकारच्या तपासण्याव्यतिरिक्त सी. टी. स्कॅनसारख्या तपासण्यांची आवश्यकता भासत असल्याने कोविड व नॉनकोविड रूग्णांसाठी एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी श्री. नवाल (Collector Shri. Nawal) यांनी दिली. ते म्हणाले की, मशिनच्या क्षमता वैशिष्ट्यानुसार ही दर आकारणी निश्चित करण्यात आली आहे. एचआरसीटी-चेस्ट तपासणीसाठी 16 स्लाईसच्या मशिनसाठी दोन हजार रूपये, मल्टि डिटेक्टर सीटी (एम डी सीटी) 16 ते 64 स्लाईसच्या मशिनसाठी अडीच हजार रूपये, 64 स्लाईसहून अधिकच्या मशिनसाठी तीन हजार रूपये दर निश्चित केले आहेत. या रकमेत सीटी स्कॅन तपासणी, तपासणी अहवाल सिटी फिल्म, पीपीई कीट, डिसइन्फेक्टेड, सॅनिटायझेशन चार्जेस व जीएसटी यांचा समावेश आहे. एचआरसीटी चेस्ट नियमित व तातडीच्या तपासणीसाठी हे समान दर लागू राहतील. या आदेशापूर्वी जर एखाद्या तपासणी केंद्राचे दर कमी असतील, तर ते कमी दर लागू राहतील.
एचआरसीटी- चेस्ट तपासणी केल्यानंतर अहवालावर कोणत्या सिटी मशिनद्वारे तपासणी केली ते नमूद करणे बंधनकारक आहे. कोणत्याही डॉक्टरच्या प्रिस्किप्शनशिवाय ही तपासणी करू नये. तपासणी करणा-या रेडिओलॉजिस्टने संपूर्ण तपासणी अहवाल देणे बंधनकारक आहे. ज्या रूग्णाकडे आरोग्य विमा योजना आहे किंवा एखाद्या रूग्णालयाने किंवा खासगी आस्थापनेने तपासणी केंद्राशी सामंजस्य करार केलेला असेल तर हे दर लागू राहणार नाहीत.
रूग्णालये किंवा तपासणी केंद्रांनी एचआरसीटी- चेस्ट तपासणीसाठी निश्चित केलेले दर दर्शनी भागात लावणे, तसेच निश्चित दरानुसार दर आकारणी करण्याबाबत हॉस्पिटल व्यवस्थापनाला सूचना देणे बंधनकारक राहील. एचआरसीटी- चेस्ट तपासणीकरिता निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर (महापालिकेचे क्षेत्र वगळून) जिल्हाधिकारी, तर महापालिकेच्या क्षेत्रात महापालिका आयुक्त सक्षम प्राधिकारी आहेत. त्यानुसार निश्चित दरापेक्षा जादा दर आकारणा-या केंद्रांवर कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, नपा मुख्याधिकारी व इतर यंत्रणांना आवश्यक त्या तपासण्या वेळोवेळी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.