वरुड दी २६- पत्नीवर संशय घेत पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करुन पतीने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना येथून जवळच असलेल्या बेनोडा (शहीद) येथे आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पत्नी मात्र गंभिरावस्थेत अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.
प्राप्त माहीतीनुसार, बेनोडा (शहीद) येथील रहिवाशी असलेला मनोहर दानसा आहाके (३२) त्याचे पत्नीसह राहात होता. गेल्या अनेक दिवसांपासुन तो पत्नीवर संशय घेत होता. अनेकदा दोघांमध्ये खटकेही उडायचे. दोन दिवसांपुर्वी रात्री ११ च्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि मनोहर याने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पत्नी ही गंभिररित्या जखमी झाली. गंभिरावस्थेत तिला वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात व तेथून अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. सद्य: ती मृत्यूशी झुंज देत आहे. दुसरीकडे पत्नीवर हल्ला केल्यानंतर नैराश्येमध्ये गेलेल्या मनोहर आहाके ह्याने त्याच दिवशी गावाशेजारी असलेल्या राजेंद्र फरकाडे यांचे शेतातील विहीरीत त्याने उडी घेतली होती. गेल्या दोन दिवसांपासुन गावकरी व नातेवाईकांनी मनोहर याचा सर्वदूर शोध घेतला परंतु तो कुठेही आढळून आला नाही, आज सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह राजेंद्र फरकाडे यांचे शेतातील विहीरीत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांना माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहीरीबाहेर काढून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता वरुडच्या ग्रामिण रुग्णालयात रवाना केला. यासंदर्भात बेनोडा (शहीद) पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास ठाणेदार सुनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्टेबल संजय गो:हे, संतोष आवंदकर करीत आहेत.
या घटनेने बेनोडा (शहीद) गावामध्ये खळबळ माजली आहे.