मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच
खासदार उदयनराजे ने दिली माहिती
मुंबई/दि.१८– मी कधी राजकारण करत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच, असं वक्तव्य भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे यांनी केलं. मराठा आरक्षणाबाबत एक ठोस निर्णय व्हावा, अशी इच्छा त्यांनी केली.
इतर समाजांप्रती मला आदर आहे. मात्र प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. न्यायालयाने सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणार हे स्वाभाविक आहे, असंही उदयराजे म्हणाले.
मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतो, मी कधी राजकारण केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच. फक्त मराठा समाजासाठीच नाही इतर कोणावर अन्याय होत असतील तर त्यांच्यासाठीही लढणार. कोणावर अन्याय झाला आणि वेळ आली तर राजीनामा देणार. काय होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग? असं उदयनराजे म्हणाले.
राज्य सरकारने साडेबारा हजार पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली. मात्र सरकारच्या या निर्णयाला खासदार संभाजीराजे, देवेद्र फडणवीस यांच्यासह मराठा समाजाच्या नेत्यांनी विरोध केला. या विषयी विचारलं असता, मी पोलीस भरतीवर भाष्य करणार नाही, असं उदयनराजे म्हणाले.
सध्या लोकशाही आहे. राजेशाही असती तर दाखवलं असतं. माझं एकच म्हणणं आहेअन्याय होत असे तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागायला हवं. लोकांच्या माध्यमातून तुम्ही निवडून जाता, तेवढं भान ठेवलं पाहिजे आणि प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे. नाहीतर आणा राजेशाही, मग मी दाखवतो, काय करायचं, काय नाही, असं उदयनराजे म्हणाले.