मराठी

महेंद्री अभयारण्य झाल्यास नुकसान नव्हे तर फायदाच होणार

अमरावती येथील वन्यजीव प्रेमींसह इतरांची पत्रकार परिषदेत माहिती

वरुड/दि.२१ – गेल्या काही दिवसांपासुन तालुक्यातील महेंद्री राखीव वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्याबाबत हालचाली सुरु असतांना या परिसरातील रहिवाशांनी या अभयारण्याला विरोध दर्शविणे सुरु केल्यानंतर विविध चर्चांना पेव फु टले आहे. अशा स्थितीत आज अमरावती येथुन आलेल्या वन्यजीव प्रेमींनी पत्रकार परिषदेत महेंद्री येथे अभयारण्य झाल्यास होणारे विविध फायदे उपस्थितांना समजावुन सांगत याकरिता लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन करीत या अभयारण्याला विरोध न करण्याचे आवाहन केले.
शहरातील न्यु ऑरेंजसिटी कॉन्व्हेंटच्या कॉन्फरंन्स हॉलमध्ये पार पडलेल्या या प्रसंगी या वन्यजीव प्रेमींनी विविध मुद्यांना हात घातला. त्यामध्ये या जंगलामध्ये वाघ, बिबट, अस्वल, लांडगा, रानकुत्रा, चितळ, चिंकारा, चौशिंगा, सांबर आदी अनेक प्रजातीचे प्राणी व अनेक २१२ प्रजीतीचे पक्षी आढळुन येत आहे. या वन्यजीव प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे व त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. या जंगलात वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प व मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या दरम्यान असलेल्या वन्यजीव भ्रमण मार्गातील अतिशय महत्वाचे जंगल क्षेत्र आहे. वन्यप्राणी या मार्गाचा वापर करुन एका संरक्षित जंगलातुन दुस:या संरक्षित जंगलात नेहमीच जात येत असतात. महेंद्री जंगल झाल्यास वन्यप्राण्यांना कायमस्वरुपी भ्रमण मार्ग उपलब्ध होईल. या परिसरात मोठ्या प्रमाणात मृदा व जलसंधारणाचे कामे करता येईल व त्याचा फायदा परिसरातील शेतकरी व रहिवाशांना होईल, या भागात वन्यजीव व्यवस्थापन योग्यप्रकारे होईल व त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल, या जंगल क्षेत्रात साधारणत: १०० वर्षापर्यंत नामशेष झालेल्या आहे म्हणुन समजण्यात आलेला रानपिंगळा पक्षी दिसुन येतो, अभयारण्य झाल्यास वन्यपर्यटन मोठ्या प्रमाणात विकसित होईल, प्रस्तावित अभयारण्यामध्ये वन्यजीव सफारी, साहसी खेळ टॅ्रकिंग, उपहार गृह, निवास व्यवस्था इत्यादी सुविधा पर्यटकांना देता येईल व त्यातुन रोजगार निर्माण होईल. या अभयारण्याच्या लगत असलेल्या शेकदरी परिसरात सुंदर पर्यटन स्थळ विकसित करता येवु शकते. ज्यामध्ये बोटिंग, ट्रॅकिंग, धबधबा दर्शन, उपहार गृह सुविधा देता येईल, या अभयारण्याला नागपुर , अमरावती, वर्धा, मुलताई, बैतुल आदी शहरांपासुन जवळ रस्त्याने जोडले असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतील. व त्याचा फायदा परिसरातील स्थानिक लोकांना मिळेल, याशिवाय विविध कारणे सुद्धा यावेळी उपस्थितांना सांगण्यात आली. सदर जंगल क्षेत्र अभायारण्य म्हणुन घोषित झाल्यास परिसरातील कोणत्याही गावातील लोकांचे नुकसान होणार नाही उलट अभयारण्य लगतच्या गावांना डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेमार्फत प्रतीगाव २५ लाख अनुदान मिळु शकेल, या अनुदानातुन गावकरी सोलर फेन्सिंग, दुधाळ गाय-म्हशी खरेदी, एल.पी.जी.इत्यादी अनेक योजना शासन निर्णयाप्रमाणे अंमलात आणु शकेल.
या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे सचिन आंजीकर, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.जयंत वडतकर, कार्स वन्यजीव संस्थेचेे अध्यक्ष प्रा.डॉ.सावन देशमुख, मानद वन्यजीव रक्षक विशाल बनसोड, अरन्यम संस्थेचे अध्यक्ष सर्वेश मराठे, पर्यावरण प्रेमी सुकृत चौधरी, आवेश शेख, कुला फाऊंडेशनचे प्रथमेश नाखले, पर्यावरण अभ्यासक प्रा.डॉ.सुनिल कोंडुलकर, प्रा.डॉ.संजय सातपुते, प्रा.डॉ.ओ.एस.देशमुख यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button