वरुड/दि.२४ – तालुक्यातील रोशनखेडा नजीकच्या ग्रीन पार्क हॉटेल अॅन्ड बारमधुन अवैधरित्या देशी दारुची विक्री करणा:या एका इसमाला मुद्देमालासह उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे यांची टीम व वरुड पोलिसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या मोहिमेत अटक करण्यात आली.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनखेडा नजीकच्या ग्रीन पार्क हॉटेल अॅन्ड बारमध्ये अवैधरित्या देशी दारुची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन उपविभागीय पोलिस अधिकारी कविता फडतरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रविंद्र शिरसाट, हे.कां.भारत धाकडे, पो.कां.बबन भोकरे, रुपेश बहुरुपी, गोवर्धन नाईक, वरुडचे पो.का.सचिन भाकरे, मिलींद वाटाणे यांनी धाड टाकली असता घटनास्थळावर १८० मिलीच्या बॉबी संत्रा देशी दारुच्या ४ सीलबंद पेट्या ज्यामध्ये एकुण १९२ नग तसेच खुल्या १८ नग, ९० मिलीच्या ३ पेट्या व खुल्या ३० नग असा एकुण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणात केशव महादेवराव अढाऊ (४०) रा.आंबेडकर चौक वरुड याला ताब्यात घेण्यात आले असुन ग्रीन पार्क हॉटेल अॅन्ड बार रोशनखेडा येथे गेल्या अनेक दिवसांपासुन अवैधरित्या दारुची विक्री केल्या जात असुन अनेकदा या ठिकाणी पोलिसांनी कार्यवाह्या सुद्धा केल्या आहेत परंतु सदर बारमालकाच्या या अवैध कार्यवाह्या कमी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.