मराठी

नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करा

वन विभागाचे अधिकारी व गावक-यांसोबत बैठक

यवतमाळ/दि. ५ -: केळापूर तालुक्यात टिपेश्वर अभयारण्यालगत असलेल्या गावात वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाच्या हल्ल्यात गावकरी जखमी होत असून शेतक-यांच्या जनावरांची शिकार होत आहे. त्यामुळे या नरभक्षक वाघाला तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देश वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी वनविभागाच्या अधिका-यांना दिले.
शासकीय विश्रामगृहात कोपामांडवी, अंधारवाडी, टेंभी व पाटणबोरी येथील गावकरी व वनविभागाच्या अधिका-यांसोबत वनमंत्र्यांनी बैठक घेतली. यावेळी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी, यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक रामाराव, जि.प.सदस्य गजानन बेजंनकीवार, यवतमाळचे उपवनसंरक्षक केशव वाबळे, पांढरकवडाचे उपवनसंरक्षक सुभाष दुमारे, विभागीय वनअधिकारी संदीप चव्हाण, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, कोपामांडवीचे सरपंच हनमंत कायपल्लीवार आदी उपस्थित होते.
यावेळी वनमंत्री राठोड म्हणाले, नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी 20 जणांच्या टीमने दिवसरात्र पेट्रोलिंग करावे. लोकांच्या संपर्कात राहून गावक-यांना धीर द्यावा. तसेच या वाघाला पकडण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीम आणि विशेष व्याघ्र संरक्षण दल वाहनांसह तैनात करावी. गावक-यांना आपापली जनावरे चराई संदर्भात जमीन उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव मांडण्यात येईल. टिपेश्वर अभयारण्यालगत असणा-या गावातील शेतक-यांनी मागणी केल्यास त्यांना 75 टक्के अनुदानावर सोलर फेंन्सिगचा लाभ द्यावा. अभयारण्यालगत तारेचे कुंपण घालावे. जेणेकरून वन्यप्राणी नागरी वस्त्यांमध्ये येणार नाही. तसेच वन्यप्राण्यांकडून होणारी नुकसान भरपाई संबंधित शेतक-यांना तात्काळ उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश वनमंत्र्यांनी दिले.
वाघाच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झालेल्या गावक-यांना वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते एकूण दोन लक्ष रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यात सुकळी येथील रामबाई आत्राम यांना 30 हजार रुपयांचा धनादेश, टेंभी येथील सागर रामगिरवार (30 हजार रुपये), गजानन शेंडे (21 हजार रुपये), संतोष सैपटवार (18750 रुपये), सुन्ना येथील अरुण जिड्डेवार (19500 रुपये), विजय एंबडवार (18750 रुपये), टेंभी येथील यादव बडवाईकर (16500 रुपये), अंधारवाडी येथील लिंगा मेश्राम (15 हजार रुपये), इंद्रदेव कुमरे (7500 रुपये),कोब्बई येथील मोरेश्वर कुमरे (11250 रुपये), टेंभी येथील पंचफुला सोयाम (11250 रुपये) यांना धनादेश देण्यात आले.
बैठकीला वन विभागाचे अधिकारी व राहूल ताडविल्लेवार, सुभाष मेश्राम, गंगारेड्डी सुनकरवार यांच्यासह आदी गावकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button