मराठी

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचा महत्त्वाचा निर्णय़

11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे 1 हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन

मुंबई/दि.२८ – राज्यात सर्वसामान्यांना परवडेल अशा दरांत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देत त्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या एसटी महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय़ घेण्यात आला आहे.
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणानिमित्त प्रवाशांची संख्या, गर्दी वाढण्याचे संकेत आहेत. त्यानुसार वाढती मागणी लक्षात घेऊन, एसटी महामंडळानं 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत दररोज सुमारे 1 हजार विशेष जादा फेऱ्यांचं नियोजन केलं आहे. या जादा फेऱ्या राज्यभरातील प्रमुख बसस्थानकांवरून सुटणार आहेत.
सध्या टप्प्याटप्प्यानं या बस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली. आगाऊ आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या 222.www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. एसटी महामंडळामार्फत दिवाळी सणानिमित्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दरवर्षी नियमित बस फेऱ्या व्यतिरिक्त जादा फेऱ्या सोडण्यात येतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही एसटी महामंडळाने जादा बस फेऱ्या सुरु करण्याचं नियोजन केलं आहे. अर्थात, राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोविड-19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यकत्या सर्व सूचना आणि नियमांचे काटेकोर पालन करीत सुरक्षित प्रवासी वाहतूक करण्याचे निर्देश स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाच्या मुख्यालयातून देण्यात आले आहेत. या बाबतीत प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन दिवाळी सणानिमित्त होणारी जादा वाहतूक निर्विघनपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचना महामंडळाच्या वाहतूक विभागामार्फत स्थानिक आगाराला दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button