आठ महिन्यानंतर सेवा क्षेत्रातही सुधारणा
मुंबई/दि.४ – देशातील सेवा क्षेत्राला ऑक्टोबरमध्ये गती मिळाली. इंडिया सर्व्हिस बिझिनेस अॅसक्टिव्हिटी इंडेक्स सप्टेंबरमध्ये 49.8 च्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 54.1 वर गेला. फेब्रुवारीनंतर प्रथमच निर्देशांक 50 च्या वर आला आहे. आयएचएस मार्केट इंडिया सर्व्हिसेस पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) नुसार जेव्हा निर्देशांक 50 च्या वर असेल, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो, की संबंधित व्यवसाय क्षेत्राने चांगली वाढ केली आहे. त्याचप्रमाणे 50 पेक्षा कमी निर्देशांक म्हणजे संबंधित व्यवसाय क्षेत्रात घट असे मानले जाते.
ऑगस्टमध्ये उत्पादन उद्योगाने पुनर्प्राप्ती सुरू केली. आयएचएस मार्केटचे इकॉनॉमिक असोसिएट डायरेक्टर पॉलियाना डी लिमा म्हणाल्या, की ऑगस्टमध्ये उत्पादन क्षेत्र सावरण्यास सुरवात झाली; परंतु सेवा क्षेत्राला आता वेग आला आहे. सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी नवीन कॉन्ट्रॅक्ट आणि व्यवसायातील कामांमध्ये ठोस विस्तार दर्शविला आहे. म्हणजे या क्षेत्रात मागणी वाढली आहे. उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांतील कर्मचा-यांची संख्या घटली आहे. त्यामुळे सलग आठव्या महिन्यांत खासगी क्षेत्रातील कर्मचा-यांची संख्या कमी झाली आहे. कर्मचारी कामावर परत येत नाहीत. लिमा म्हणाल्या, की सर्वेक्षणातील सहभागींनी सांगितले, की जे कर्मचारी रजेवर गेले आहेत, ते पुन्हा कामावर परत आले नाहीत. कोरोना संसर्गाच्या भीतीने कर्मचारी अजूनही कामावर परत यायला तयार नाहीत.
सेवा क्षेत्रातील इनपुट कॉस्ट 8 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. सेवा उत्पादनांच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, पुढील 12 महिन्यांपर्यंत या क्षेत्रात चांगल्या व्यवसायाची अपेक्षा दिसून आली. संमिश्र पीएमआय आउटपुट निर्देशांक 54.6 वरुन 58 वर आला. ऑक्टोबरमध्ये पीएमआय आउटपुट निर्देशांक 58 वर आला. सप्टेंबरमध्ये तो 54.6 वर होता. संमिश्र निर्देशांक सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांची स्थिती दर्शवितो. संमिश्र निर्देशांकातील वाढ हे दर्शवते, की जवळपास नऊ वर्षांत खासगी क्षेत्राचे उत्पादन सर्वांत वेगवान राहिले आहे.