मराठी

इम्रान यांनी काश्मीर काढला विकायला

विरोधकांचा आरोप

इस्लामाबाद/दि.१७ – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात सर्व प्रमुख विरोधी पक्ष एकवटले आहेत. विरोधकांनी शक्ती प्रदर्शन करत गुजरांवालामध्ये सरकारविरोधात सभा घेतली. या वेळी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्करावर जोरदार टीका केली. त्यांनी लष्करप्रमुख बाजवा आणि आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हामीद यांचे नाव घेऊन टीका केली. विरोधी पक्षांच्या ‘पाकिस्तान डेमोक्रेटीक मूव्हमेंट‘च्या पहिल्या सभेत शरीफ यांनी लंडनहून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभाग घेतला. पाकिस्तान लष्करप्रमुख बाजवा यांचे नाव घेऊन पाकिस्तानमध्ये दोन सरकार कोणी तयार केली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्करावर शरीफ यांनी सडकून टीका केली. तुम्ही मला देशद्रोही ठरवू शकता, माझी संपत्ती जप्त करू शकता, खोटे गुन्हे दाखल करू शकता; मात्र नवाज शरीफ लोकांसाठी कायम बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. खोटी प्रकरणे, गुन्ह्यासाठी आयएसआय प्रमुख फैज हामीद जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानमध्ये सत्तेवर असलेले इम्रान खान यांचे सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका नागरिकांना बसत आहे. न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतरही एक हुकूमशहा देशातून पळून गेला, तर दुसरीकडे एक लोकनेत्याला दोषी सिद्ध करण्यासाठी धडपड सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. या वेळी इतर विरोधी पक्षांचीही भाषणे झाली. बिलावल भुट्टो-झरदारी यांनी इम्रान खान यांना काश्मीरच्या मुद्यावर इस्लामिक जगताला एकत्र आणणे शक्य झाले नसल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न केला असल्याचाही आरोप केला. इम्रान यांचा उल्लेख इम्रान नाझी असा करत बिलावल भुट्टो-झरदारी यांनी म्हटले आहे, की इम्रान हे कठपुतळी असून त्यांना सत्तेवर बसवण्यात आले आहे. दरम्यान, विरोधकांच्या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचे सत्ताधारी पक्षाने म्हटले आहे. सरकारविरोधात ११ विरोधी पक्ष एकत्र आले असले, तरी लोकांनी विरोधकांकडे पाठ फिरवली असल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Back to top button