टाळेबंदीच्या काळात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारात वाढ
नवी दिल्ली दि १५ – टाळेबंदीच्या काळात जगभरात महिलांवरील कौटुंबिक हिंसाचारात वाढ झाली आहे. भारतात आरोग्य यंत्रणेवरही गंभीर परिणाम झाला आहे. नकोशी असलेली गर्भधारणा व असुरक्षित गर्भपातातही मोठी वाढ झाली. या स्थितीबाबत संसदेच्या आरोग्य संबंधित स्थायी समितीने चिंता व्यक्त केली आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी विशेष अभियान राबवण्याची शिफारस केली आहे.
समितीने टाळेबंदी काळातील महिलांची मानसिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्यासंबंधित स्थितीवर चिंता व्यक्त केली. चीन, ब्रिटन, अमेरिकेसह इतर देशांतून आलेली आकडेवारी भयावह असल्याचे म्हटले आहे. टाळेबंदीमुळे प्रजनन संबंधित सेवांनाही हादरा बसला आहे. यातून दिलासा देण्यासाठी रूपरेषा आखावी, असे समितीने म्हटले आहे. या काळात महिलांवर घरगुती हिंसाचारही वाढला. हिंसाचार आणि लैंगिक शोषणाच्या बळी ठरलेल्या महिलांसाठी विशेष हॉटलाइन, टेलिमेडिसिन सेवा, रेप क्रायसिस सेंटर व समुपदेशनाची व्यवस्था करावी, अशी शिफारस या समितीने केली आहे. भारतात कोरोना काळात महिलांवरील घरगुती हिंसाचार वाढल्याचे राष्ट्रीय महिला आयोगानेही म्हटले आहे.
आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये टीव्ही बसवावेत. कारण, अनेक विद्यार्थी स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर घेऊ शकत नाहीत. या काळात लाखो महिलांवर बेरोजगारी ओढवली. अशा महिलांना सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात यावेत, असे या समितीने म्हटले आहे. एका संशोधनानुसार, टाळेबंदीच्या 25 मार्च ते जूनदरम्यान सुमारे 18.5 लाख महिला नकोसा असलेला गर्भ नष्ट करू शकल्या नाहीत. यापैकी सुमारे ऐंशी टक्के महिलांना औषध न मिळाल्याने त्या गर्भपात करू शकल्या नाहीत.