मराठी

कोरोनाबाधित रूग्णांच्या समुपदेशनासाठी स्वतंत्र हेल्पलाईन

विद्यापीठाच्या सहकार्याने प्रशासनाचा उपक्रम

अमरावती, दि. 18 : कोरोनाबाधित रूग्णांच्या समुपदेशनासाठी व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागातर्फे स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच या विषयावर बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. त्यावेळी अशी हेल्पलाईन रुग्णांचे मनोबल वाढविणे व सतत संपर्कासाठी उपयुक्त ठरेल. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याचे निर्देश त्यांनी दिले.

त्यानुसार विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागातर्फे हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाकडून कौन्सेलिंग अँड सायकोथेरपी या विषयात एम. ए. अभ्यासक्रम चालविला जातो. त्यानुसार विभागातील सुमारे 32 तज्ज्ञ व अभ्यासकांचे हेल्पलाईनसाठी पथक तयार करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त होणा-या यादीनुसार या पथकांकडून संबंधित रूग्णाशी संपर्क साधून त्याची विचारपूस केली जाते, तसेच त्यांच्या अडचणी जाणून घेऊन समुपदेशन केले जाते, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. श्रीकांत पाटील यांनी दिली.

अनेकदा उपचार घेणा-या रुग्णांची मानसिक अवस्था चिंतेची असते. अशावेळी त्यांना योग्य समुपदेशन मिळाल्यास उपचार परिणामकारकपणे होण्यास मदत मिळते. कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. असे बरे होऊन घरी परतलेल्यांचे प्रमाण जिल्ह्यात लक्षणीय आहे. दुर्देवाने अशा रुग्णांनाही कधी-कधी घरी परतल्यावर शेजा-यापाजा-यांकडून संपर्क तोडला जाण्याचे अनुभव येऊ शकतात. अशा काळात त्यांना मानसिक उभारी देण्याच्या दृष्टीने या पथकातील सदस्य काम करतात. ही प्रक्रिया नियमितपणे राबविण्यात येत आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी दिली.

कोरोना योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे लक्षणे असणा-यांनी तत्काळ उपचार घेतले पाहिजेत. इतरांनीही कुठलेही गैरसमज न बाळगता आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन इतरांचेही मनोबल टिकवून राहील, अशी सौहार्दपूर्ण वर्तन ठेवले पाहिजे, असेही आवाहन त्यांनी केले. पवन देशमुख व विविध तज्ज्ञ, तसेच अभ्यासकांचे सहकार्य या उपक्रमाला मिळत आहे.

Related Articles

Back to top button