मराठी

सर्वाधिक रुग्णवाढीत भारत जगात पहिला!

२४ तासांत देशात ८३ हजार ८८३ नवीन रुग्ण

नवी दिल्ली/दि. ३ – देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता ३८ लाखांहून अधिक झाली आहे. एका दिवसात जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८३ हजार ८८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. याआधी २९ ऑगस्ट रोजी ७८ हजार ४७९ रुग्ण सापडले होते. आज १०४३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या एकूण रुग्णांची संख्या ३८ लाख ५३ हजार ४०७ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या आठ लाख १५ हजार ५३८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ६७ हजार ३७६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे २९ लाख ७० हजार ४९३ रुग्ण बरे झाले झाले आहेत. अमेरिका-ब्राझील या देशांपेक्षा भारतात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. अमेरिका-ब्राझीलमध्ये एक कोटीहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत अमेरिकेत ४० हजार ८९९ तर, ब्राझीलमध्ये ४८ हजार ६३२ रुग्ण सापडले. एका आठवड्यात नवीन रुग्णांच्या संख्येबरोबरच अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही वाढली आहे. २६ ऑगस्ट ते एक सप्टेंबरमध्ये अ‍ॅक्टिव्ह रुग्ण रोज १.५ टक्क्यांच्या सरासरीने वाढत आहेत. ७६ हजार ४३१ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे मृत्यूदर आणि अ‍ॅक्टिव्ह केस रेटमध्ये घट झाली आहे. मृत्यूदर १.७५ टक्के झाला आहे. अ‍ॅक्टिव्ह रेट २१ टक्के झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के आहे.

Related Articles

Back to top button