नवी दिल्ली/दि.२० – देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे पुनःपुन्हा विविध ठिकाणी टाळेंबदी करावी लागत आहे. सततच्या संसर्गवाढीमुळे आणि टाळेबंदीमुळे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट असल्याने भारताचा आर्थिक विकास धोक्यात आला असल्याचे जागतिक बँकेने जाहीर केले. आरोग्य, कामगार, जमीन, कौशल्ये व वित्त या क्षेत्रांना आर्थिक संकटातून बाहेर येण्याची तातडीने गरज असल्याकडे बँकेने लक्ष वेधले. जागतिक बँकेने भारताचा आर्थिक विकासदर चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१) ३.२ टक्के राहील, असे भाकित मे महिन्यात केले होते. आक्रसलेला आर्थिक विकास पुढील आर्थिक वर्षात (२०२१-२२) सावरेल, असेही त्या वेळी बँकेने म्हटले होते. या पाश्र्वभूमीवर, गेल्या काही आठवड्यांत नवी आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेपुढे उभी ठाकली असल्याचे जागतिक बँकेने ‘इंडिया डेव्हलपमेंट अपडेट‘ या अहवालात नमूद केले आहे. या अहवालात म्हटल्याप्रमाणे, चालू आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट जीडीपीच्या ६.६ टक्के राहील आणि पुढील आर्थिक वर्षात ही तूट किंचित कमी होऊन जीडीपीच्या ५.५ टक्के राहील. भारतीय अर्थव्यवस्था आदीच संकटात असताना आणि मंदीचे चटके सहन करत असतानाच कोरोना संकट आल्यामुळे अर्थव्यवस्था सावरण्यास खूप कठीण जाणार आहे. देशाची अर्थव्यव्सथा सावरण्यासाठी केंद्र सरकारने अनेक चांगले उपाय योजले आहेत, अशा शब्दांत जागतिक बँकेने कौतुकही केले आहे. कॉर्पोरेट करात कपात, छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देऊन नियमांमध्ये बांधून न ठेवणे यांसारखे उपाय योजले आहेत; परंतु कोरोनाच्या वैश्विक साथीने या सर्व उपायांचे फलित दिसण्यास विलंब लागणार आहे.
मंदीची कारणे
-
बाजारपेठांमधील आडमुठेपणा
-
बँकिंग व कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताळेबंदावरील ताण
-
बिगरवित्त क्षेत्रावर आलेला ताण
-
जोखीम उचलण्याची औद्योगिक क्षेत्रांची संपलेली क्षमता
-
वस्तू व सेवांची ग्रामीण भागात कमी झालेली मागणी
-
जागतिक अर्थव्यवस्थेची नाजूक स्थिती
अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने
-
कोरोना रुग्णांमध्ये दरदिवशी होणारी वाढ
-
जागतिक स्तरावर असलेले नकारात्मक वातावरण
-
आरोग्य, रोजगार, कौशल्यविकास, वित्तपुरवठा यांवर आलेला प्रचंड ताण
-
घटता जीडीपी – २०१७-१८ मध्ये ७ टक्के, २०१८-१९ मध्ये ६.१ टक्के, २०१९-२० मध्ये ४.२ टक्के
केंद्र सरकार रिझव्र्ह बँकेच्या सहकार्याने कोरोना संसर्गाचा परिणाम कमी करण्यासाठी पावले उचलत आहे. आर्थिक गाडा रुळांवर आणण्यात येणारी अनिश्चितता आणि कोरोना संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संधी यांचे भान सरकारला आहे. – जुनैद अहमद, जागतिक बँक