पुणे दि. ११ – सध्या जगभरात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोनावार नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातही अनेक शास्त्रज्ञ आणि संस्था त्यासाठी प्रयत्न करीत असताना ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने पुण्यातीस ‘सिरम‘ या कंपनीची लस डिसेंबर महिन्याच्या सुरुवातील लाँच करणार असल्याची माहिती या कंपनीचे प्रमुख अदर पूनावाला यांनी दिली.
पुढील दोन आठवड्यांमध्ये कोरोना लसीची चाचणी सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेसोबत करण्यात येईल. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आम्ही लसीचे उत्पादन सुरू करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया‘ने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या इतर देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्या दृष्टीने आता पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने आणखी एक पाऊल उचलले आहे.
सिरम ही संस्था, जीएव्हीआय ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून कोरोना लसीसाठी १५०० डॉलर्सचा निधी दिला जाणार आहे. जीएव्हीआयमार्फत निधी ‘सिरम‘ ला कोरोना लसीच्या उत्पादनसाठी दिला जाईल. ‘सिरम इन्स्टिट्यूट‘ २०२१ पर्यंत शंभर कोटी डोस पुरवणार आहे. या लसीची जास्तीत जास्त किंमत तीन यूएस डॉलर्स म्हणजे साधारण २२५ ते २५० रुपयांच्या घरात असेल, अशी माहिती ‘सिरम इन्स्टिट्यूट‘ने दिली. ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया‘ ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातली एक उत्तम संस्था असा या संस्थेचा लौकिक आहे. जगभरात सध्या कोरोनावरच्या अनेक लसींवर काम सुरू आहे. यापैकी काही लसी मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत. ‘सिरम‘नेही ऑक्सफर्ड आणि अमेरिकेच्या नोव्हाक्स या कंपनीसोबत लसींसंदर्भातला करार केला आहे. यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्याला संमती मिळाली, तर ‘सिरम इन्स्टिट्यू‘ला लस उत्पादनासाठी निधी मिळणार आहे.
लसीकरण आराखड्याबाबत आज बैठक
लस खरेदी, प्राधान्यक्रम आणि वितरण यासंबंधी निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती बनवण्यात आली आहे. नीती आयोगाचे डॉ. व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली या तज्ज्ञ समितीची उद्या बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. सध्याच्या घडीला लस हाच कोरोना विसाणूच्या संकटातून मुक्ती मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे. जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचल्या आहेत. सर्व काही सुरळीत झाले, तर सप्टेंबरपासून लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होऊ शकते. त्या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे लसीकरण कसे करायचे, त्याचा आराखडा निश्चित करण्यासंदर्भात बुधवारी टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक होणार आहे.