नवी दिल्ली/दि. २१ – देशात तयार झालेल्या लसींची चाचणी सध्या सुरू असून या वर्षीच्या शेवटपर्यंत भारतात लस उपलब्ध होऊ शकते, असा दावा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी केला. ‘भारत बायोटेक‘ने बनवलेली कोव्हॅक्सिन ही कोरोनावरील स्वदेशी लस या वर्षाच्या शेवटी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले. २०२१ च्या पहिल्या तिमाहीत ही लस वापरासाठी तयार असेल, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले.
जगभरात लसींची चाचणी फास्ट-ट्रॅकमध्ये केली जात आहे. तसेच स्वदेशी लशींची चाचणी या वर्षाच्या शेटवटपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. या लसी किती परिणामकारक आहेत, हे तेव्हापर्यंत स्पष्ट होणार आहे. बाजारात पोहोचण्याचा कालावधी आणखी कमी करावा, या दृष्टीने ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया‘ आधीपासूनच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे उत्पादन करत आहे. उर्वरित दोन लसी तयार होऊन त्या बाजारात येईपर्यंत आणखी एखाद महिन्याचा काळ लागेल, असे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट‘ने भारतात आपल्या लशीची मानवी चाचणी सुरू केली आहे. अस्त्राजेनेकाची ही लस या वर्षाच्या शेवटपर्यंत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे. हैदराबादच्या ‘भारत बायोटेक‘च्या या कोव्हॅक्सिन या लशीची चाचणी दोन आठवड्यांपूर्वी सुरू करण्यात आली. ही लसदेखील या वर्षाच्या शेवटपर्यंत उपलब्ध होऊ शकेल. ‘झायडस कॅडिला‘नेदेखील मानवावर कोरोना लसीची क्लिनिकल चाचणी करणे सुरू केले आहे. काही महिन्यांमध्ये ही चाचणीही पूर्ण होईल.
स्वस्त दरात लस देण्याला प्राधान्य
भारत हा जगातील सर्वांत मोठा लस निर्माण करणारा देश आहे. भारत जगातील लसींच्या गरजेच्या दोन तृतियांश इतका भाग निर्यात करतो. आयसीएमआर आणि ‘भारत बायोटेक‘ने एक करार केला असून भारतातील लस निर्मिती यशस्वी झाल्यास भारतात ती स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यास प्राथमिकता दिली जाणार आहे, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.