स्वदेशी हायपरसॉनिक टेक्नोलॉजी डेमोनस्ट्रेटर भारतातच तयार
एपीजे अब्दुल कलाम रेंजवर यशस्वी चाचणी
![hypersonic-technology-amravati-mandal](https://mandalnews.com/wp-content/uploads/2020/09/hypersonic-technology-amravati-mandal-780x470.jpg?x10455)
बालासोरदि /७ – भारताने हायपरसॉनिक टेक्नोलॉजी डेमोनस्ट्रेटर (HSTDV) स्वदेशात तयार करण्यात यश मिळवले आहे. हे भारतीय संरक्षण आणि विकास संस्था )डीआरडीओ)चे सर्वांत मोठे यश मानले जात आहे. ओडिशातील बालासोर येथील एपीजे अब्दुल कलाम रेंजवर सोमवारी याची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी स्क्रॅम जेट इंजिनच्या मदतीने लाँच करून घेण्यात आली. याबरोबरच हायपरसॉनिक स्पीड मिळवणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. आतापर्यंत हे तंत्रज्ञान केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्वीट करून ‘डीआरडीओ‘चे कौतुक केले. पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारत व्हिजन पूर्ण करणे आणि हे यश मिळवल्याबद्दल ‘डीआरडीओ‘च्या टीमचे अभिनंदन करतो. मी या टीमच्या संशोधकांशी बोललो आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. भारताला त्यांच्यावर अभिमान आहे, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, भारत येत्या पाच वर्षांमध्ये हायपरसॉनिक मिसाइल तयार करू शकेल. एका सेकंदात दोन किलोमीटर अंतर पार करणारे हायपरसॉनिक मिसाइल आवाजापेक्षा सहापट अधिक वेगवान असतात. भारतात तयार होणारया क्षेपणास्त्रांमध्ये ‘स्क्रॅमजेट प्रपल्शन सिस्टीम‘ असणार आहे. या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे डीआरडीओ प्रमुख जी सतीश रेड्डी टीमने सोमवारी सकाळी ११.०३ मिनिटाला प्रायोगिक लाँच केले. चाचणीची प्रक्रिया पाच मिनिटे सुरू होती. चाचणीसाठी ‘लाँचिंग कंबशन चेम्बर प्रेशर वेहिकल,‘ ‘एअर इनटेक‘ आणि कंट्रोल असे सर्वच मापदंड तंतोतंत ठरले आहे.