मराठी

औद्योगिक प्रगतीच्या मापनासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक

अमरावती, दि.३ : उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र  हे देशात अग्रेसर राज्य असून, देशाच्या एकूण सकल उत्पन्नात 14 टक्के व एकूण औद्योगिक उत्पादनात 15 टक्के वाटा आहे. औद्योगिक प्रगतीचे मापन औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने करता येते. देशाच्या उत्पादनवाढीचा वेग व राज्या-राज्यांतील तुलना यासाठी त्याचा उपयोग होतो. यासंबंधीचे स्वतंत्र संकेतस्थळच विकसित झाल्याने धोरणांचा आढावा घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचे स्वतंत्र वेब पोर्टल कार्यान्वित झाले असून, त्यामुळे राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अर्थ व सांख्यिकी महासंचालनालय व उद्योग संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टल’चे ऑनलाईन उद्घाटन झाले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, अप्पर मुख्य सचिव (नियोजन) देबाशिष चक्रवर्ती, अप्पर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंह, अर्थ व सांख्यिकी संचालक र. र. शिंगे उपस्थित होते.
राज्यांनी औद्योगिक उत्पादन निर्देशांक परिगणित करावा अशी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाची शिफारस आहे. त्यामुळे हे पोर्टल विकसित करण्यात आले असून, भविष्यात उद्योगविषयक महत्वाच्या आकडेवारीची उपलब्धता होणार आहे. त्यामुळे राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचे उद्योग धोरण ठरविणे, ते प्रभावीपणे राबविणे, धोरणांचा नियमित आढावा घेणे यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. कोरोना प्रतिबंधासाठी लागू संचारबंदीने अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. अशावेळी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी निर्देशांकाचा उपयोग होणार आहे. उद्योगांची दर महिन्याला माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी जिल्हा उद्योग कार्यालयाकडे असून, ती दर महिन्याच्या पाच तारखेला वेब पोर्टलवर नोंदवली जाणार आहे.

Related Articles

Back to top button