मराठी

महागाईचा पतधोरणावर परिणाम

आजपासून बैठक; व्याजदर जैसे थे राहणार

मुंबई दि १ – भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) दोन डिसेंबरपासून पतधोरण आढावा सुरू करेल. या वेळी केंद्रीय बँक सलग तिसर्‍यांदा धोरणात्मक दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेऊ शकेल, असे मानले जात आहे. तज्ज्ञांनुसार, किरकोळ महागाई दरात बदल होणार नाही. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय पतधोरण समितीची दोन दिवसांची बैठक होईल. निर्णयांची घोषणा चार तारखेला होईल.
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची ऑक्टोबरमध्ये बैठक झाली होती. तीत पतधोरणात कोणताही बदल केला नव्हता. त्यानंतर महागाईत सातत्याने वाढ होत गेली. आता महागाई निर्देशांक 7.6 टक्क्यावर आहे. महागाई दर चार टक्क्यांच्या आत ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे. केअर रेटिंग्जचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले, की महागाई अद्यापही खूप वर आहे. अशा स्थितीत रिझर्व्ह बँकेकडे धोरणात्मक दर जैसे थे ठेवण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. यामुळे व्याजदरांत बदल होणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत.
सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या चालू वित्त वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीतही जीडीपीचा वृद्धी दर नकारात्मक राहिला. त्यामुळे केंद्रीय बँक पतधोरणाचा कल नरम ठेवू शकते. ब्रिकवर्क रेटिंग्जचे मुख्य आर्थिक सल्लागार एम. गोविंदा राव म्हणाले, की ग्राहक मूल्य निर्देशांक(सीपीआय) आधारित महागाई सध्या बरीच आहे. खाद्यान्नात तसेच अन्य क्षेत्रातील मुख्य महागाई जास्त आहे. कोटक महिंद्रा बँक समूहाच्या शांती एकम्बरम म्हणाल्या, की रिझर्व्ह बँकेचे लक्ष्य महागाई चार टक्क्यांवर आणणे आहे. अशा परिस्थितीत व्याजदर बदलाची शक्यता नाही.

Back to top button