जिल्हाधिका-यांकडून विभागीय संदर्भ रुग्णालयात व्यवस्थेची पाहणी
'सुपर'मध्ये स्वतंत्र कोविड ओपीडी सुरू
अमरावती, दि. 14 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथील विभागीय संदर्भ रुग्णालय, तसेच वलगाव येथे विलगीकरण केंद्र येथील सुविधांची पाहणी केली. कोरोनाबाधितांवरील उपचारांना गती मिळावी व गृह विलगीकरणातील रुग्णांबाबतच्या प्रक्रियेत सुसूत्रता असावी म्हणून विभागीय संदर्भ रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली आहे. त्याची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी भूषण, स्टाफ नर्स वर्षा पागोटे आदी यावेळी उपस्थित होते.
लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना गृह विलगीकरणाची परवानगी दिली जाते. मात्र, विलगीकरणाच्या काळात त्यांनी घराबाहेर पडून इतरांच्या संपर्कात येऊ नये यासाठी त्यांच्याकडून बंधपत्र लिहून घेतले जात आहे. ही कार्यवाही अचूकपणे करावी. ओपीडीसाठी स्वतंत्र रस्ता व दिशानिर्देश करणारे फलक लावावेत. रुग्णालयाजवळ गर्दी टाळण्यासाठी आवश्यक तिथे बॅरिकेटस लावावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी दिले.
सध्या विभागीय संदर्भ रुग्णालयात 350 खाटांची व्यवस्था आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची पुरेशी व्यवस्था आहे. आवश्यकतेनुसार इतरही तजवीज ठेवावी. अनेकदा एक्सरे आदींची गरज भासते. त्यामुळे वाहतुकीची सोय म्हणून स्वतंत्र इलेक्ट्रिक ऑटोची व्यवस्था करावी. बहुतेक खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे. मात्र, तरीही एकदा संपूर्ण तपासणी करून घ्यावी. जोखमीच्या रुग्णांना सुपर स्पेशालिटीत उपचार दिले जातात. त्यात अलीकडे व्हेटिंलेटरची गरज असलेले रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे त्यानुसार वेळीच व्यवस्था ठेवावी, आदी निर्देश जिल्हाधिका-यांनी यावेळी दिले.
रुग्णांसोबत येणा-यांनी विशेष काळजी घ्या : डॉ. रवीभूषण
संशयित किंवा रुग्णांसोबत येणा-या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक असते. अनेकदा त्यांच्याकडूनच नियम पाळले जात नसल्याचे आढळते. त्यामुळे सोबत येणा-या व्यक्तींनी नियम पाळण्याचे आवाहन डॉ. रवीभूषण यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, विवाहसमारंभाचा काळ आहे. त्यामुळे जनजीवनातील व्यवहार वाढले आहेत. मात्र, अशावेळी आपली सुरक्षा आपणच घेतली पाहिजे आणि कुठलेही लक्षण जाणवल्यास तत्काळ चाचणी करून घेतली पाहिजे.