मराठी

मध्यमवर्गीयांनाही पाच लाखांचे विमा कवच केंद्र सरकारची मोठी भेट

आयुष्यमान भारत योजनेत समावेश

मुंबईः आरोग्याच्या बाबतीत देशातील मध्यमवर्गाला केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवत असताना सरकारने देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांचा त्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांनाही उपचारांसाठी वर्षाकाठी पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच मिळणार आहे.  यापूर्वी केवळ आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोकच या योजनेचा लाभ घेऊ शकत होते; परंतु आता देशातील मध्यमवर्गीयही या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांच्या आरोग्य विम्यास पात्र ठरणार आहेत. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (एबी पीएम-जेएवाय) अंतर्गत सर्व आरोग्य विमा योजना एकत्रित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशभरात ही योजना राबविणारी संस्था राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) च्या गव्हर्निंग कौन्सिलने तिला मान्यता दिली आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना या योजनेचा फायदा होऊ शकेल. या योजनेचा पायलट प्रकल्प आता सुरू होईल. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कोणती पावले उचलण्याची गरज आहे, हे समजू शकेल. या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठक केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आत्तापर्यंत दहा कोटी ७४ लाख कुटुंबातील ५३ कोटी लोक आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेंतर्गत रूग्णालयात पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार  विनामूल्य केले जात आहेत.

Related Articles

Back to top button