सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
दुर्गामंडळ आणि जनतेला मिरवणूका काढता येणार नाहीत
वर्धा/दि ४ – कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित आहे. यासाठी वर्धा जिल्हयात नवरात्रोत्सवा दरम्यान होणारी गर्दी कमी करुन कोविड या आजाराचा प्रसार टाळण्याकरीता या वर्षीचा नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रोत्सवा दरम्यान मिरवणुका, शोभायात्रा काढता येणार नसून साधेपणाने, गर्दी होणार नाही याची जाणीव ठेऊन साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी केले आहे.
नवरात्रोत्सवाचे आयोजन करणा-या मंडळांना सबंधित नगर पालिका किंवा ग्राम पंचायतीची पूर्व परवाणगी घेणे आवश्यक राहील. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावे. देवीची सजावट साध्या पध्दतीने करावी,देवी मुर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरीस ऐवजी प्राधान्याने पर्यावरण पुरक मातीच्या मूर्तीची स्थापना करावी. मंडळासाठी 4 फुट उंच व घरगुती 2 फुट उंची पर्यंतच मूर्तीची स्थापना करता येईल. मुर्ती ऑनलाईन पध्दतीने विकत घेण्यास प्राधान्य द्यावे. देवीच्या मुर्ती विक्री करीता स्थानिक प्रशासनाने शासनाच्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेऊन जागा निश्चित करुन इश्वर चिठ्ठीने जागा वाटप करावी. मुर्ती विक्रीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावावा.
देवीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूका काढता येणार नाहीत. तसेच विक्री ठिकाणाहून मुर्ती आणणेकरीता सार्वजनिक मंडळांतर्फे जास्तीत जास्त 4 व्यक्ती व घरगुती देवीसाठी जास्तीत जास्त 2 व्यक्तींना जाण्याची परवानगी असेल. सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने कमीत कमी व साधी सजावट करावी. दरवर्षी प्रमाणे मोठा मंडप न टाकता केवळ मुर्ती व सजावट यांचे पावसापासून संरक्षण होईल इतपत आकाराचे मंडप उभारावेत. मंडळांना वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गदी आकर्षित होणार नाही याची काळजी घ्यावी. कुठल्याही प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करु नये. त्याऐवजी कोरोना विषयक बॅनरव्दारे जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच आरोग्य शिबिर, आरोग्य विषयक कार्यक्रम करावे. माझे कुंटूब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करावी.
आरती, भजन किर्तन किंवा अन्य कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन ,केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी माध्यमाव्दारे उपलब्ध करुन दयावी. दररोज देवीच्या मंडपाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे. भाविकांसाठी शारीरीक अंतराचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष दयावे. विर्सजनाच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर मुर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी विसर्जित करण्यास सक्त मनाई असणार आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन विभाग, आरोग्य विभाग, पर्यावरण, वैद्यकिय शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेली कोरोना सबंधित आदेशात व विहित केलेल्या नियमांचे पालन करणे नवरात्रोत्सव मंडळांना बंधनकारक असेल. असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.