दंगलीप्रकरणात ट्रम्प यांना शिक्षा होणे अवघड
वाॅशिंग्टन/दि.८ – अमेरिकेच्या संसदेत गुरुवारी झालेल्या दंगल आणि हिंसाचारासाठी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाच जबाबदार मानले जात आहे. ट्रम्प यांच्यामुळेच मोठ्या संख्येने जमलेल्या त्यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिलमध्ये हिंसाचार केला आणि यामध्ये चाैघांचा जीव गेला; पण कायद्याने ट्रम्प यांना जबाबदार धरून शिक्षा दिली जाईल का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यातही व्हाइट हाउसमधून बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांना अटक होणार का, याबाबतही साशंकता आहे. त्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी अजूनही 12 दिवस आहेत. अशात त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच पदावरून हटवण्यात येईल का असेही सवाल उपस्थित केले जात आहेत.
अमेरिकेच्या राज्यघटनेतील 25 व्या दुरुस्तीनुसार अध्यक्षांना त्यांचेच मंत्रिमंडळ हटवू शकते. यासाठी मंत्रिमंडळाच्या बहुमतासह उपराष्ट्राध्यक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळाला वाटते, की गुरुवारी झालेल्या हिंसाचारासाठी ट्रम्प यांचे भडकावू भाषणच जबाबदार आहे. त्यामुळे, ट्रम्प यांना 12 दिवस पूर्ण होण्याआधीच पदावरून हटवण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवणे कठीण आहे. त्यांना हटवणेसुद्धा वाटते तितके सोपे नाही. कारण, उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स त्यांच्या पाठीशी आहेत. ट्रम्प यांना त्यांनी सुनावले असले, तरीही ते ट्रम्प यांची साथ सोडणार नाहीत.
सात जानेवारी रोजी घडलेल्या घटनेला अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस म्हटले जात आहे, तरीही ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना पदावरून हटवण्यास उपराष्ट्राध्यक्ष इच्छुक नाहीत. असे झाल्यास रिपब्लिकन्स पक्षाच्या राजकारणावर तो एक डाग ठरेल. दुसरे कारण म्हणजे, चार वर्षांनंतर येणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन्सचे उमेदवार पेन्स ठरतील. त्यांनी ट्रम्प विरोधात काही निर्णय घेतल्यास त्यांना पुढच्या निवडणुकीत ट्रम्प समर्थकांचा पाठिंबा मिळणे अशक्य राहील. अशात ट्रम्प यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता फार कमी आहे.
ट्रम्प यांच्याच भडकावू भाषणामुळे हिंसाचार उसळल्याचे सबळ पुरावे तपास संस्थांकडे उपलब्ध आहेत. कॉर्नेल लॉ इंस्टिट्यूटचे प्रा. डेविड ओहलीन यांच्या मते, हिंसाचारासाठी ट्रम्प हेच जबाबदार आहेत. त्यांनी गुन्हा केला असून त्यांच्यावर खटला चालवायला हवा. जॉर्ज वॉशिंगटन लॉ युनिर्व्हसिटीचे डीन फ्रेडरिक लॉरेन्स सांगतात, की कार्यवाहक अटॉर्नी जनरल माइकल शेरविन यांनीसुद्धा ट्रम्प यांच्यावरील कारवाईचे समर्थन केले आहे. चर्चा होत असल्या तरीही कायद्याने ट्रम्प यांच्याकडे दोन कार्ड आहेत. पहिले म्हणजे, अध्यक्ष म्हणून ते एखाद्या चुकीसाठी स्वतःला माफ करू शकतात. दुसरे म्हणजे, माफी नाही मिळाली तरीही खटला झाल्यास त्याला वेळ खूप जाणार आहे. अशात कायद्यातील पळवाटा शोधून ते सुटतील. कारण, त्यांनीच हिंसाचार घडवला याचे प्रत्यक्ष पुरावे नाहीत.