जिल्ह्यात पोषण माह अभियान प्रभावीपणे राबवा
अमरावती, दि. 12 : पोषण अभियानातंर्गत सप्टेंबर महिना पोषण माह म्हणून साजरा करण्यात येत असून, त्यात सॅम बालकांची आरोग्य तपासणी, पालकांचे समुपदेशन व इतर सर्व उपक्रमांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
कुपोषण निर्मूलनाच्या दृष्टीने शासनाकडून नियोजनपूर्वक भरीव पावले उचलण्यात येत असून, सप्टेंबर महिन्यात पोषण माह अभियानानिमित्त विविध उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे. सॅम बालकांची आरोग्य तपासणी, पालकांचे समुपदेशन आदी बाबींसह पोषण व आरोग्य दक्षतेच्या दृष्टीने भरीव कार्यक्रम आखण्यात आला आहे. जिल्ह्यात मेळघाटसह सर्वदूर त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात पोषण माह अभियानात प्रत्येक आठवड्यात दोन वेळा प्रत्येक अंगणवाडीनिहाय सर्व सॅम बालकांची स्क्रिनिंग करण्याचे, त्याचप्रमाणे, त्यांच्या पालकांची बैठक घेऊन त्यांचे समुपदेशन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार अधिकारी व कर्मचारी यांच्या बैठका घेऊन अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागाशी समन्वय साधून सर्व सॅम बालकांची आरोग्य तपासणी करण्याबाबत नियोजन करण्यात आले असून, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांच्या समन्वयाने अंमलबजावणी होत आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतुल भडांगे यांनी दिली.
पोषण माह अभियानात जिल्हा कार्यक्रम अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी पोषण माह दरम्यान दोन सॅम व दोन मॅम बालकांना दत्तक घेण्याच्याही सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दत्तक घेतलेल्या सॅम व मॅम बालकांचे पोषण व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी अधिका-यांवर सोपविण्यात आली आहे. त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणार आहेत. अल्पसंख्याक विभागाशी समन्वय साधून नयी रोशनी पोषण माह या उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार आहे जेणेकरून या उपक्रमाची परिणामकारता वाढण्यास मदत होणार आहे.
पहिल्या 1000 दिवसांचे महत्व तसेच लवकर स्तनपानाचे महत्व या विषयी पोषण माहमध्ये अंगणवाड्यांतून जनजागृती करण्यात येणार आहे. पोषण माह राबवित असताना कोव्हिड-19 च्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या मागदर्शक सूचनांचे व प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना दक्षता उपाययोजना काटेकोरपणे पाळूनच कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे महिला व बालविकास अधिकारी श्री. भडांगे यांनी सांगितले.