
वॉशिंग्टन/दि.५ – अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीत सध्या डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा आघाडीवर आहेत. बायडेन विजयाच्या अगदी जवळ पोहचले आहेत. अमेरिकेच्या 120 वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रमही बायडेन यांनी नोंदविला.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीही बायडेन अमेरिकेच्या राजकारणात सक्रिय होते. या वेळी त्यांच्यासाठी संधी जास्त आहे. ओबामा यांच्या कार्यकाळात त्यांनी दोनदा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. या वेळी त्यांनी जर अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, तर वयाच्या 78 व्या वर्षी ते अमेरिकेचे सर्वात वयस्कर अध्यक्ष असतील. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बायडेन अमेरिकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तंदुरुस्त आहेत.
अमेरिकेचा पुढील अध्यक्ष कोण असेल याबद्दल आता फारशी शंका नाही; परंतु अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. तथापि, बायडेन खूप पुढे आहेत. त्यांना 538पेक्षाही 264 मते मिळाली, तर ट्रम्प यांना 214 मते मिळाली. ते निवडून आले, तरी त्यांची कारकीर्द संघर्षात सुरू होईल. त्याचे कारण ट्रम्प यांनी निवडणुकीविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. बायडेन निवडून आल्यानंतर त्यांची भारताबाबत काय भूमिका असेल, याकडे आपले लक्ष लागले आहे. भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करताना बायडेन यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, की भारताला भेडसावणा-या समस्यांचा सामना करण्यासाठी भारतीयांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही दिली होती.