मराठी

कंगनाचा सूर बदलला

मुंबई व महाराष्ट्राबाबत व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई/दि.५ – मुंबई पोलिसांवर टीकाटिप्पणी व आरोप केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचा(KANGANA RANUAT) सूर अखेर बदलला आहे. मुंबई व महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तिने अखेर ‘जय मुंबई’, ‘जय महाराष्ट्र’ असा नारा दिला आहे. त्यामुळे आता हा वाद शमण्याची चिन्हे आहेत.
‘गुंड व माफियांपेक्षा मला मुंबईची जास्त भीती वाटते’ असे म्हणणारी व सुशांतसिंह राजपूत(SUSHANT SINGH RAJPUT) प्रकरणात मुंबई पोलिसांवर आरोप करणारी कंगना राणावत हिच्यावर राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून टीकेची झोड उठली होती. कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल, तर तिने आपल्या राज्यात निघून जावे, असा इशारा शिवसेना, मनसेने दिला होता. कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे मत खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले होते. सिनेक्षेत्रातील मंडळींनीही कंगनाला मुंबई व महाराष्ट्राबद्द कृतज्ञता बाळगण्याचा सल्ला दिला होता. अनेक सेलिब्रिटींनी थेट तिच्यावर टीका न करता ‘मुंबई मेरी जान’ म्हणत कंगनाला अप्रत्यक्ष तिच्या चुकीची जाणीव करून दिली होती.
मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिक कंगनाविरोधात रस्त्यावर उतरले होते. तिच्या फोटोला ‘जोडे मारो’ आंदोलनही सुरू केले होते. ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. कंगनानेही सुरुवातीला आव्हानाची भाषा केली होती; मात्र प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन तिचा सूर अखेर बदलला. तिने ‘जय मुंबई, जय महाराष्ट्र’ असा नारा दिला आहे. आपल्या ट्वीटमध्ये तिने पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, “महाराष्ट्रसह देशभरातील माझ्या सर्वच ठिकाणच्या मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा हेतूबद्दल कोणालाही शंका नाही आणि माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दलचे माझे प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मला स्वीकारणाऱ्या मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र!”

Related Articles

Back to top button