नासिक दि.७-देशातील पहिल्या किसान पार्सल एक्स्प्रेसला शुक्रवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. ते म्हणाले कि किसान पार्सल एक्स्प्रेसमुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचा नाशवंत माल कमी दरात थेट बिहारपर्यंत जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळून त्यांची प्रगती होण्यास मदत होईल. एका अर्थाने किसान पार्सल एक्स्प्रेस शेतकऱ्यांसाठी रामबाण ठरेले. देवळाली कॅम्प ते दानापूर (बिहार) दरम्यान पहिली किसान एक्स्प्रेस धावणार आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि इतर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी किसान एक्स्प्रेस सुरू करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार देवळाली कॅम्प ते दानापूर दरम्यान देशातील पहिली किसान पार्सल एक्स्प्रेस सुरू करण्यात आली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, आमदार सरोज आहेर आदी मान्यवर या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित होते. याप्रसंगी तोमर म्हणाले, कोरोना संकटाच्या काळात देशाचा विकास थांबला असला तरी शेतीक्षेत्र मात्र त्यापासून प्रभावित झाले नाही. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, नाशिक जिल्हा कृषीसाठी महत्त्वाचा जिल्हा असून, देशातील पहिली रेल्वे नाशिकमधून सुरू होत आहे. नाशिकची निवड ही सार्थ निवड असून, किसान रेल्वेच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पादनांना व्यापक बाजार पेठ मिळून या रेल्वेचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल. पहिल्याच गाडीला फुलांच्या माळा लावून सजविण्यात आले होते. कृषिमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी किसान एक्स्प्रेस दानापूरकडे रवाना झाली. पहिल्याच दिवशी नाशिकरोड रेल्वेस्थानकातून तब्बल 22 टन, तर मनमाड रेल्वेस्थानकातून 26.50 टन माल दानापूरकडे रवाना करण्यात आला. देवळाली रेल्वेस्थानकावर ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमास रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.