अकोला/दि.१३ – एअर इंडियाचे दुबईहून आलेले विमान केरळमधील कोझिकोड विमानतळावर घसरुन अलिकडेच झालेल्या दुर्घटनेत वैमानिक, सह-वैमानिक व प्रवाशांसह १८ जण मृत्यूमुखी पडले. या मृतांच्या वारसांना वैयक्तिक साह्य म्हणून अल अदील ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत २० लाख रुपयांचीं मदत केली आहे.
यासंदर्भात बोलताना डॉ. दातार म्हणाले, माझे दिवंगत वडील महादेव दातार हेसुद्धा भारतीय हवाईदलाचे माजी अधिकारी होते त्यामुळे मला या दलाविषयी प्रबळ आत्मीयता आहे. मी या विमान अपघाताची बातमी ऐकली तत्क्षणी त्यातील मृतांसाठी स्वतःहून काही मदत करण्याची उर्मी मनात दाटून आली.’ ते पुढे म्हणाले, ‘या दुर्दैवी विमान फेरीतील अनेक प्रवासी असे होते ज्यांनी परदेशातील त्यांचे रोजगार गमावले होते. अनेकजण व्हिजिट व्हिसाची मुदत संपल्यामुळे मायदेशी परत येत होते. अनेकांपुढे आर्थिक विवंचना होत्या. अशा स्थितीत मृत प्रवाशांवर अवलंबून असणाNया कुटूंबियांवरील किमान आर्थिक दडपण काहीसे हलके व्हावे म्हणून मी वैयक्तिकरीत्या हा पुढाकार घेतला आहे. गेलेला जीव परत येणार नाही याचे दुःख आहेच, पण या अर्थसाह्यामुळे किमान मृतांच्या कुटूंबाना अडचणींवर मात करण्यात मदत तरी होईल. मी एअर इंडियाच्या आपत्ती व्यवस्थापन संघाशी थेट समन्वय साधून ही मदत अखंड स्वरुपात योग्य व गरजू लोकांच्या हाती पडेल यासाठी प्रयत्न केले आहेत. मला नेहमीप्रमाणेच भारतीय कॉन्सुलेटचा या मोहिमेसाठीही पाठिंबा मिळाला आहे.