बुलडाणा दी/३-कोरोना लस घेण्यासंदर्भात काही ठिकाणी अजूनही गैरसमज आहे. या गैरसमजाला बळी पडून अनेक नागरिक कोविडची लस घेण्यासाठी धजावत नाहीत. शासनाकडून जनजागृतीच्या माध्यमातून ही सर्व मिथकं दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. बुलडाण्यात उच्च शिक्षित असलेल्या मुस्लीम समाजाच्या नवरदेवाने तर स्वतःच्या लग्नात लस घेण्याचे आवाहन करत सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. आपल्या लग्नसमारंभात आलेल्या वऱ्हाडी मंडळींना त्याने लग्न लावणाऱ्या मौलवींच्या मदतीने कोविड लस घेण्यास आवाहन केलेय. कोरोनावर नियमंत्रण मिळवण्यासाठी लस हा नामी उपाय असल्याचे या नवरदेवाने सांगितले आहे.
लस घेण्याचे वऱ्हाडी मंडळींना आवाहन
लग्नसमारंभात लग्न लावण्याच्या वेळी व्यासपीठावर नवरदेव मोहम्मद आमीर पोहचल्यानंतर त्यांनी लग्न लावणाऱ्या मौलवींना एक विनंती केली. आमीर यांनी मौलवी यांच्या माध्यमातून लग्न मंडपाच्या बाहेर सुरू असलेल्या कोविड लसीकरण शिबिरात लग्न समारंभात सहभागी झालेल्या वऱ्हाडी मंडळींना लस घेण्याचे आवाहन केले.
मौलवींनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी घेतली लस
विशेष म्हणजे लग्नाची तिथी वाचल्यानंतर मौलवी रहेमत हाफिज यांनी शेवटी उपस्थित वऱ्हाडी मंडळींना कोरोनावर एकमात्र उपाय असलेली कोविड लस घेण्यास आवाहन केले. यावेळी मी सुद्धा लग्नानंतर माझ्या पत्नीसोबत कोविड लस घेणार असल्याचे नवरदेव आमीर यांनी सांगितले. मौलवींनी आवाहन केल्यानंतर अनेक वऱ्हाडी मंडळींनी लसीकरण शिबिरात जाऊन लसीचे डोस घेतले. याची सुरुवात नवरीकडून लग्नासाठी आलेले इस्माईल चौधरी यांनी जेवणानंतर थेट लसीकरण शिबिरामध्ये जावून कोविड लसीचा पहिला डोस घेतला. त्यानंतर लस घेण्यासाठी लग्नात आलेल्या पाहुण्यांनी रांगा लावल्या होत्या