स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी मिळणार
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली माहिती
पुणे/दि. २७ – स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना राबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली.
आज राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून विविध मागण्या आणि प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महामंडळाला बळकटी देण्यासंदर्भात करण्यात येत असलेल्या उपायोजनांबाबत सविस्तर सादरीकरण केले.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ,सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, साखर संघाचे संजय खताळ, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह राज्यातील विविध ऊस तोड संघटनांचे प्रतिनिधी राज्य सहकारी महासंघाचे अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यातील ऊस तोडणी कामगारांचे अनेक प्रलंबित असलेले प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून कशापद्धतीने मार्गी लावता येतील यासंदर्भात सविस्तर सादरीकरण सामाजिक न्याय विभागाच्यावतीने करण्यात आले.
ऊसतोड कामगारांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी महामंडळाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना तसेच महामंडळाला स्वायत्त व सक्षम बनवण्यासाठी करण्यात येणारी नियमावली याबाबतची सविस्तर माहिती यावेळी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली.
महामंडळाचे प्रादेशिक स्तरावर कार्यालय, कंपनी कायद्याअंतर्गत नियमावली बनवणे, ऊसतोड कामगार, पशु, वाहने आदींची नोंदणी करून ओळखपत्र देणे, नवीन पदांना मंजुरी देणे, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, ऊसतोड कामगार महिलांसाठी आरोग्याच्या विविध योजना, त्याचप्रमाणे ऊसतोड कामगार यांच्यासाठी विमा योजना यासह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शरद पवार यांनी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांच्या प्रश्न सोडविण्यास मदत होणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. शिवाय
महामंडळाला देण्यात येणाऱ्या बळकटीबाबत सामाजिक न्याय विभागाच्या कार्याचे समाधान व्यक्त केले तसेच महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांचे जास्तीत जास्त प्रश्न समस्या सोडवण्यासाठी नोव्हेंबरअखेर महामंडळाची नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पुर्ण क्षमतेने सूरू करण्याचे निर्देश खासदार शरद पवार यांनी यावेळी दिले.