मराठी

कुष्ठरूग्ण शोध व सक्रिय क्षयरूग्ण शोध अभियानाला प्रारंभ

नागरिकांनी आरोग्य पथकाला सहकार्य करावे

अमरावती, दि. 1 : कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत जनजागृती, रुग्णांचा शोध व उपचार यासाठी संयुक्त कुष्ठरुग्ण शोध व सक्रिय क्षयरूग्ण शोध अभियानाचा प्रारंभ आजपासून झाला. जिल्ह्यात हे अभियान 16 डिसेंबरपर्यंत राबविण्यात येणार असून, साडेचार लाखांहून अधिक गृहभेटी देण्यात येणार आहेत.
समाजातील कुष्ठरोग व क्षयरोगाचे रुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना तत्काळ उपचार मिळवून देण्यासाठी या संयुक्त अभियानात आरोग्य पथकांकडून घरोघर जाऊन कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पथकाला आवश्यक ती पूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलश नवाल यांनी केले आहे.
जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात झाला. समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण यांना लवकरात लवकर शोधून त्वरित उपचार देणे, संसर्गाची साखळी खंडित करणे, जनजागृती करणे ही अभियानाची उद्दिष्टे आहेत. अभियानात घरोघर जाऊन 22 लाख 62 हजार 7  नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी एक महिला व एक पुरूष कर्मचारी असलेल्या 1 हजार 551 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांचे पर्यवेक्षण 310 पर्यवेक्षक करतील. या सर्वांनी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश श्री. येडगे यांनी दिले.
आरोग्य उपसंचालक एम. एस. फारूखी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, डॉ. के. एस. वासनिक, डॉ. दिलीप निकोसे, डॉ. रेवती साबळे, डॉ. दीपक च-हाटे, विनोद प्रधान, दीपक गडलिंग आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button