-
प्रजासत्ताक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद
अमरावती २२ – महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात शिक्षण क्षेत्रात अंधार निर्माण करण्याचे काम आजवरच्या शासनाने केले आहे. त्याविरोधात नेटाने लढा देण्याची ताकद केवळ शिक्षक भारती संघटनेतच आहे. विद्यमान स्थितीत शिक्षण क्षेत्रात सत्ताधिशांनी मोठा काळोख निर्माण केला असून तो आम्ही संपवून टाकू आणि शिक्षण क्षेत्राला पुन्हा एकदा चांगले दिवस आणू असा विश्वास शिक्षक भारतीचे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील अधिकृत उमेदवार दिलीप आनंदराव निंभोरकर यांनी व्यक्त केला. यवतमाळ येथे प्रजासत्ताक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षक भारतीचे उमेदवार दिलीप निंभोरकर यांच्या समर्थनार्थ संघटनेचे पदाधिकारी तसेच शिक्षक बांधवांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिलीप निंभोरकर यांच्यासह प्रजासत्ताक संघटनेचे प्राचार्य डॉ.सुभाष गवई तसेच अन्य मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून राज्य सरकारच्या धोरणांवर आगपाखड करत शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायावरून सरकारला धारेवर धरले. तसेच अमरावती विभागातील आजवरच्या शिक्षक प्रतिनिधींनी स्वत:चा वैयक्तिक स्वार्थ साधण्याच्या पलीकडे काहीही केले नसून त्यांना आता योग्य जागा दाखविण्याची वेळ आल्याचा सुर या बैठकीत निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षक भारतीचे दिलीप निंभोरकर यांनाच निवडून देण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले. या बैठकीला परिसरातील शिक्षकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. आजच्या काळात विनाअनुदानित शिक्षक मोठ्या विपरित स्थितीतून जात आहेत. अनेकांची यंदाची दिवाळी देखील अंधारात गेली आहे. मात्र, त्यांची दखल इथल्या सरकारने घेतलेली नाही.
शिक्षकांचे संसार उध्वस्त करण्याचे महापाप येथील सरकारने केले असून आता यापुढे असे होणार नाही यासाठी आपण पक्का निर्धार करूनच निवडूणकीत पाऊल टाकले आहे. शिक्षकांना न्याय देणे हे माझे कर्तव्य असून ते पूर्ण केल्याशिवाय मला चैन पडणार नाही असे वक्तव्य दिलीप निंभोरकर यांनी शिक्षकांशी बोलताना केले. यावेळी शिक्षकांनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेऊन सहकार्य करण्याचे कबुल केले. शिक्षक भारती ही शिक्षकांची जीवंत संघटना – प्राचार्य डॉ. गवई महाराष्ट्रात शिक्षकांच्या अनेक संघटनांपैकी शिक्षकांच्या प्रश्नांवरून कोणतीही घालमेल न करता नेटाने लढा देणारी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वातील शिक्षक भारती ही शिक्षकांची एक जीवंत संघटना आहे. अशा संघटनेसोबत काम करताना आम्हाला देखील आनंद होतो आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडून बहुजनांच्या मुलांना हक्काचे शिक्षण मिळवून देत त्यांचा परिपूर्ण विकास घडवून आणणारी शिक्षणप्रणाली अस्तित्वात यायला हवी यासाठी शिक्षक भारतीला आमची सदैव साथ राहील असा विश्वास प्राचार्य डॉ.सुभाष गवई यांनी यावेळी व्यक्त केला.