मुंबई/दि. ९ – प्लाझ्मा थेरपी(PLASMA THERAPY) कोरोना रुग्णांचा मृत्यू रोखण्यास प्रभावी नाही. ही माहिती ‘इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च‘ने केलेल्या अभ्यासात समोर आली आहे. ‘आयसीएमआर‘ ने सांगितल्यानुसार, प्लाझ्मा थेरपीच्या मदतीने कोरोना रुग्णांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही. १४ राज्यांच्या ३९ हॉस्पिटलमधील ४६४ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचे परीक्षण करण्यात आले. ही थेरपी कोरोना रुग्णांवर किती प्रभावी आहे, हे समजण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी दोन ग्रुप बनवण्यात आले. इंटरवेंशन आणि कंट्रोल. इंटरवेंशन ग्रुपमध्ये २३५ कोरोना रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला, तर कंट्रोल ग्रुपमध्ये २३३ रुग्णांना कोरोनाची स्टँडर्ड ट्रीटमेंट देण्यात आली. २८ दिवस दोन्ही ग्रुपवर लक्ष ठेवण्यात आले. पहिल्या ग्रुपमध्ये ज्या २३५ रुग्णांना प्लाझ्मा देण्यात आला, त्यातील ३४ रुग्णांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या ग्रुपमध्ये प्लाझ्मा न दिलेल्या रुग्णांमधील ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. दोन्ही ग्रुपमधील १७-१७ रुग्णांची परिस्थिती खालावली होती. ‘आयसीएमआर‘(ICMR) चा रिसर्च सांगतो, की प्लाझ्मा थेरपीमुळे थोडासा फायदा झाला. श्वासोच्छवासाच्या समस्या आणि थकवा ग्रस्त असलेल्या रूग्णांना काहीसा आराम मिळाला आहे; परंतु ताप आणि खोकल्याच्या बाबतीत या थेरपीचा परिणाम दिसला नाही. अमेरिकन रेड क्रॉसनुसार, कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरातून प्लाझ्मा घेऊन कोरोना संक्रमित रुग्णांना दिला जातो. त्यामुळे रुग्णांच्या शरीरात कोरोनाशी सामना करणाऱ्या नवीन प्रतिपिंडे (ANTIBODY) तयार होतात. ही थेरपी भारताशिवाय अमेरिका, स्पेन, दक्षिण कोरियासह अनेक देशात सुरू आहे.