मराठी

महिलांना सक्षम व सशक्त करण्याचे काम महाराष्ट्र महिला काँग्रेस करीत आहे – यशोमती ठाकूर

"स्वस्थ महिला-सशक्त भारत" या विषयावर "अपराजिता" उपक्रमाअंतर्गत वेबिनार द्वारे दुसरे चर्चासत्र संपन्न.

मुंबई /दि.२० – स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने “निश्चय केला आता बनणार मी अपराजिता” या उपक्रमाअंतर्गत दुसऱ्या सत्रामध्ये महिलांना आहारामध्ये महत्व समजावून देण्याच्या दृष्टीने “स्वस्थ महिला – सशक्त भारत” या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री, माननीय नामदार अ‍ॅड.यशोमती ठाकूर, अ.भा.म.कॉ. च्या सचिव तथा महाराष्ट्राच्या प्रभारी श्रीमती आकांशा ओला यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अ‍ॅड.चारुलता टोकस तर प्रमुख वक्त्या डॉ.अनुराधा मित्रा, सहाय्यक अध्यापक पोषण व आहार विभाग निर्मला निकेतन, मुंबई यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी म्हटले कि, महिलांना सक्षम करण्याबरोबरच सशक्त करण्याचे काम महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस करीत आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल भागा जसे मेळघाट पेक्षाही मुंबई – पुण्या सारख्या महानगरांमध्ये कुपोषित महिलांचे प्रमाण लोकसंख्येच्या टक्केवारीमध्ये जास्त आहे. कारण त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये वाढलेले फास्ट फूडचे प्रमाण आहे. यावेळी त्यांनी चारुलता टोकस यांचे एक चांगला विषयाबाबत चर्चासत्र घेऊन महिला भगिनींना त्यांच्या आहाराबाबत जागरूक करण्याकरिता अभिनंदन केले.

अ.भा.म.कॉ. च्या सचिव तथा महाराष्ट्राच्या प्रभारी श्रीमती आकांशा ओला यांनीही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसने कोविड लोकडाऊनच्या काळात केलेल्या कार्याची प्रशंसा केली व महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कार्य करण्याबाबत त्यांचे प्रोत्साहन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड.चारुलता टोकस यांनी सांगितले कि, स्वस्थ महिला – सशक्त भारत याचा विचार काँग्रेस पक्षाने फार पूर्वी पासून केला आहे. स्व.इंदिराजी गांधी यांनी १९८३ मध्ये ग्रामीण आदिवासी भागातील स्त्रियांच्या व बालकांच्या विकासासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात केली. त्याअंतर्गत शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांचे आरोग्य उत्तम राखण्याकरिता कार्य करीत आहेत. त्याच प्रमाणे अन्नसुरक्षा कायदा, पोषण आहार योजना या काँग्रेस सरकारने लागू केल्यामुळे देशामध्ये गरीब गरीब वर्गाचे कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. एक महिलाच दुसऱ्या महिलेच्या दुःखाला समजू शकते. त्यामुळे महिला काँग्रेसच्या प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा यामध्ये उत्कृष्ट कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ.अनुराधा मित्रा, सहाय्यक अध्यापक पोषण व आहार विभाग निर्मला निकेतन, मुंबई यांनी संतुलित व पोषक आहाराचे महत्व, ऊर्जा नियंत्रण, मेटाबॉलिक सिंड्रोम, शरीरामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी, लोहप्रमाण यांच्याबाबतची विस्तृत व सविस्तर माहिती स्लाईड शो द्वारे उपस्थितांना दिली.
या वेबिनार चर्चासत्र कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.स्मिता शहापूरकर, उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी यांनी केले. तर आभार श्रीमती उत्कर्षा रुपवते, सरचिटणीस यांनी मानले, या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षा, प्रदेश पदाधिकारी व महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या ऑनलाईन उपस्थित होत्या.

 

Related Articles

Back to top button