काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवूः आ. नाना पटोले
१२ फेब्रुवारीला ऑगस्ट क्रांती मैदानातील कार्यक्रमात पदभार स्वीकारणार
-
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच
मुंबई, दि. ८ – काँग्रेस अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी आपल्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपल्या पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठीने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक १ चा पक्ष बनवू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आ. नाना पटोले म्हणाले. आ. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पदग्रहण समारंभाच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड, प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबई काँग्रेसचे माजी आध्यक्ष एकनाथराव गायकवाड, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, माजी आमदार युसुफ अब्राहमी, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, डॉ. संजय लाखे पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस रामकिशन ओझा, देवानंद पवार, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव यांच्यासह प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत १२ तारखेला होणा-या पदग्रहण कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारच्या हुकुमशाही वृत्तीमुळे देशात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. ७० दिवसांपेक्षा जास्त कालावधीपासून देशाची राजधानी असणा-या दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केंद्रातील सरकार शेतक-यांना देशद्रोही, खलिस्तानी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. आता या देशात भाजप विरूद्ध शेतकरी अशी लढाई सुरु झाली असून काँग्रेस पक्ष या लढाईत शेतक-यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलना महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ असे सांगून पटोले यांनी आपले इरादे स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत बोलले ही नवीन बातमी आहे. कारण पंतप्रधान झाल्यापासून ते संसदेऐवजी निवडणूक प्रचारांच्या सभांमध्येच बोलतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे उदाहरण देतात, मग जीएसटीचा जो कायदा मनमोहन सिंह आणू पाहत होते त्यात बदल करून त्याला मोदींनी गब्बरसिंह टॅक्स का बनवले? या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.|
एक काळ होता अंडरवर्ल्डचे लोक दबाव आणून सेलिब्रिटींना वागायला लावतात अशी चर्चा होती पण आता तर केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे विचलीत करण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर करत आहे. सरकारही अंडरवर्ल्ड प्रमाणे वागत आहे हे गंभीर आहे.
विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि काँग्रेसकडेच राहिल काँग्रेस पक्षश्रेष्ठी कोणाला अध्यक्ष करायचे याचा निर्णय घेतील असे नाना पटोले म्हणाले.
श्रीनिवास बिक्कड
माध्यम समन्वयक
8291548899