मराठी

ममतादीदी काँग्रेससोबत ?

राजीव गांधींच्या आठवणींना उजाळा देताना मोदींवर टीका

नवी दिल्ली/दि. २६ – पश्चिम बंगालच्या(West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamta Banerjee) या काँग्रेसबरोबर व्यासपीठावर येणे टाळत होत्या; पण आता काँग्रेसबाबत त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. जीएसटी, एनईईटी आणि जेईई यासंदर्भातील बैठकीत ममतादीदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी(Rajiv Gandhi) यांची आठवण करून दिली. आज राजीव गांधींचा सन्मान होत नाही. त्यांच्या नावाने कोणतीही योजना चालवली जात नाही, असे त्या म्हणाल्या.

दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून आजच्या बैठकीत सहभागी झालेल्या ममता वेगळ्या भूमिकेत दिसल्या. ममता यांनीच सोनिया गांधी यांना बैठकीचे नेतृत्व करण्याची विनंती केली. यावर, ‘तुम्ही बैठकीला मार्गदर्शन का करत नाही?‘ असा सवाल सोनिया यांनी केला, तर ‘तुम्ही इथे असताना मी ही बैठक कशी काय घेऊ शकते, असे उत्तर ममतादींदीनी दिले. बैठकीला बोलवल्याबद्दल त्यांनी सोनिया गांधींचे आभार मानले. केंद्रातील मोदी सरकारमध्ये कुठल्याच माजी पंतप्रधानांना श्रेय दिले जात नाही. त्यांच्या नावावर कोणतीही योजना चालवली जात नाही. महात्मा गांधी यांच्या नावाने केवळ मनरेगा आणि राजीव गांधी यांच्या नावाने फक्त खेलरत्न योजना चालवली जात आहे. प्रत्येक योजनेत राज्य सरकारचा निम्मा वाटा असेल आणि केंद्र सरकाचा निम्मा; पण या योजनांचे नाव आम्ही ठरवू, असे ममता म्हणाल्या.

लाखो विद्यार्थी आहेत; पण टाळेबंदीमुळे वाहतुकीची कुठलीही सुविधा नाही. मोदी यांना परीक्षेसंदर्भात आपण कित्येक पत्रे लिहिली आहेत. विद्यार्थी अस्वस्थ असल्याने अशा परिस्थितीत परीक्षा कशी काय घेता येईल, हा मुद्दा त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात अपील करून पुनर्विचाराची मागणी करू शकते, असे आपण पत्रात म्हटल्याचे बॅनर्जी यांनी सांगितले. आपल्याला विद्याथ्र्यांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. केंद्र काही करत नसेल तर आपण लोकप्रतिनिधीही आहोत, आपण न्यायालयात जायला हवे. आपण सर्व राज्य सरकारांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करूया, असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसबाबतच्या दृष्टिकोनात बदल

काँग्रेसबाबत ममता बॅनर्जींचा दृष्टिकोन बदलल्याचे दिसून आले. यापूर्वी ममता या विरोधी पक्षांच्या बैठकीपासून दूरच राहात होत्या. कलम ३७० संदर्भात काँग्रेसने विरोधी पक्षांची बैठक बोलावली, तेव्हा त्या गैरहजर राहिल्या होत्या. ममतांनी त्या वेळी काँग्रेसवर दुटप्पीपणाचा आरोपही केला होता. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तृणमूल आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जवळ येत असल्याचे हे लक्षण आहे.

Related Articles

Back to top button