मराठी

ममता बॅनर्जींचे सुवेंदू अधिकारी यांना आव्हान

कोलकात्ता दि १८ –  पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय पारा चढू लागला आहे. सुवेंदू यांनी निवडणूक जिंकली त्या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणूक लढवण्याची घोषणा केली. सुवेंदू तृणमूल काँग्रेस (टीएमसी) सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. पूर्व मिदनापूरमधील नंदीग्राम हा त्यांचा बालेकिा मानला जातो. येथील मेळाव्यात ममता म्हणाल्या, की काही दलबदलू लोकांचा आपल्या पक्षावर फारसा परिणाम होणार नाही. तृणमूल काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा त्यातील कोणीही पक्षाकडे नव्हते. शयय झाल्यास मी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवीन. 19 डिसेंबर रोजी खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की आणि दहा आमदार यांच्यासमवेत सुवेंदू अधिकारी भाजपमध्ये दाखल झाले. यापूर्वी, गेल्या महिन्यात तापसी मंडळ, अशोक दिंडा, सुदीप मुखर्जी, सैकत पांजा, शिलाभद्र दत्ता, दीपाली बिस्वास, शुक्रा मुंडा, श्यामदादा मुखर्जी, विडजित कुंडू आणि बनश्री मैती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मिदनापुरात सुवेंदूच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार आणि खासदार राहिले आहेत. ते काँग्रेस सरकारमध्ये ग्रामीण विकास राज्यमंत्री होते आणि सध्या ते तृणमूलचे खासदार आहेत. खुद्द सुवेंदू हे सतत आमदार व खासदारकीच्या निवडणुकीत विजयी होत आहेत. सुवेंदूचा एक भाऊ खासदार आणि दुसरा नगरपालिका अध्यक्ष आहे. सहा जिल्ह्यांतील ऐंशीहून अधिक जागांवर या कुटुंबाचा प्रभाव आहे.
पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी दावा केला होता की, आपल्याकडे तृणमूल काँग्रेसच्या 41 आमदारांची यादी असून त्यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. हे लोक भाजपमध्ये सामील झाले, तर इथले सरकार पडेल.
.

Related Articles

Back to top button