अधीररंजन चौधरींच्या नियुक्तीमुळे ममता नाराज काँग्रेस-तृणमूलमध्ये दुरावा वाढणार
विरोधकाच्या ऐक्याला तडा
नवी दिल्ली/दि. १० – पश्चिम बंगाल काँग्रेसच्या अध्यक्षपदावर काँग्रेसने अधीररंजन चौध़री यांची नियुक्ती केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विरोधकांचे ऐक्य करण्याच्या प्रयत्नांना त्यामुळे तडा जाणार असून पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका त्यामुळे तिरंगी होण्याची शक्यता आहे. लोकसभेत काँग्रेसच्या संसदीय पक्षाचे नेते असूनही बंगाल काँग्रेसची धुरा कट्टर ममताविरोधक असलेल्या अधीररंजन यांच्याकडे देण्याच्या निर्णयामुळे पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत किती यश मिळेल, हा वादाचा मुद्दा आहे; परंतु काँग्रेसची ही रणनीती ममतांचे सर्वाधिक नुकसान करू शकते. तसेच काँग्रेसलाही फार काही मिळण्याची शक्यता नाही. भारतीय जनता पक्षाला मात्र त्याचा फायदा होण्याचीच जास्त शक्यता आहे. राज्यात ममता दीदींपुढे भाजपचे मोठे आव्हान आहे. लोकसभेच्या निवडणुकीत १९ जागा जिंकून भाजप हाच तृणमूलचा खरा स्पर्धक आहे, हे स्पष्ट झाले आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपविरोधकांतील मतांचे विभाजन टाळण्याचा प्रयत्न व्हायला हवा; परंतु अधीररंजन यांच्या नियुक्तीमुळे या प्रयत्नांनाच तडा गेला आहे.