पाटणा दी २ – माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचा हिंदुस्तानी आम मोर्चा हा पक्ष उद्या (ता. ३) एनडीएत सामील होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मांझी यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. राज्यसभेत बिहारची जागा रिक्त होताच मांझी यांना संयुक्त जनता दलाच्या कोट्यातून तिकीट मिळू शकेल. जागावाटपाच्या वेळी या पक्षाला दहा जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.
हिंदुस्तानी आम मोर्चाचे काही नेते संयुक्त जनता दलाच्या चिन्हावरही विधानसभेची निवडणूक लढवू शकतात. बिहारमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी महाआघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या महिन्यातच मांझी यांनी महाआघाडीच्या गठबंधनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या पक्षाचे प्रवक्ते दानिश रिझवान म्हणाले, की आमचा पक्ष राज्य आणि देशाच्या विकासाच्या मुद्यावर एनडीएत सामील होत आहे. निवडणुकीत आम्हाला किती जागा मिळतील हा मुद्दा नाही. तेजस्वी यादव यांनी आमच्या पक्षाच्या नेत्याची उपेक्षा केली.
राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर दानिश यांनी पैशासाठी उमेदवा-या वाटल्याचा आरोप केला. लालूप्रसाद यादव यांचे राज्य 15 वर्षे होते. लालूंच्या काळातील वाईट दिवस आणण्याचा तेजस्वी यांचा प्रयत्न असून हे राज्याच्या हिताचे नाही. यामुळे आमच्या पक्षाने महागठबंधन सोडले आणि एनडीएत सामील होण्याचा निर्णय घेतला. महाआघाडीतील राष्ट्रीय जनता दलाच्या एकतर्फी निर्णयामुळे मित्रपक्षांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि याचा परिणाम 20 ऑगस्टला महाआघाडी सोडण्यात आला. मांझी यांनी गठबंधनात सामूहिक निर्णय घेण्यासाठी समन्वय समितीची मागणी केली. त्यांनी अनेक वेळा पर्याय दिले; परंतु तेजस्वी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मांझी दूर गेले. राष्ट्रीय जनता दलाने कोणालाही विश्वासात न घेता तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित केले होते. आघाडीतील इतर पक्षांना हा एकतर्फी निर्णय आवडला नाही. आतापर्यंत राष्ट्रीय जनता दलाचे सात आमदार आणि विधान परिषदेचे पाच सदस्य संयुक्त जनता दलात दाखल झाले; मात्र त्याच वेळी संयुक्त जनता दलाचे आमदार आणि माजी मंत्री श्याम रजक हे मात्र राष्ट्रीय जनता दलात आले.