मराठी

घटनादुरुस्तीमुळे मराठा आरक्षण धोक्यात

माजी खासदार हरिभाऊ राठोड

ठाणेदि २- :केंद्र सरकारने जाणीवपूर्वक म्हणा अगर अजाणतेपणा म्हणा; पण, एक संविधान दुरुस्ती करताना मोठी चूक केली आहे. संविधानाच्या अनुच्छेद ३६६ मध्ये दुरुस्ती करताना २६ सी हे कलम टाकून त्याद्वारे आरक्षण देण्याचे राज्याचे अधिकार हिरावून घेतले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ एका वटहुकूमाद्वारे २६ सी कलम हटवावे; जेणेकरुन राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देणे सुकर होईल. अन्यथा, येत्या २७ तारखेच्या सुनावणीमध्ये मराठा समाजाचे आरक्षण कायमचे हिरावले जाईल, असा दावा ओबीसी भटक्या विमुक्तांचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी  ठाण्यातील पत्रकार परिषदेत केला.
बारा बलुतेदारांना आरक्षण देण्याच्या संदर्भात बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, संविधान संशोधन कायदा १०२ नुसार राज्याला एखाद्या जातीला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्याचे अधिकार काढून घेतल्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण संपूर्णतः धोक्यात आले आहे. ही बाब आपण वारंवार जनतेच्या, सरकारच्या, तज्ज्ञ वकिलांच्या तसेच मराठा समाजाच्या याचिकाकर्त्यांना तथा नेत्यांना आणि चळवळ करणार्‍या आंदोलकांच्या वारंवार लक्षात आणून दिले असतानाही, या बाबीकडे संपूर्णतः दुर्लक्ष करण्यात आले आहे.
आपण स्वतः पंतप्रधानांदेखील ही बाब कळविली आहे. केंद्र सरकारकडून संविधान संशोधनमध्ये अनुच्छेद ३४२ (अ) आणि अनुच्छेद ३६६ चे (२६ सी) हे कलम घातल्या गेल्यामुळे आपोआपच राज्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे आता देशामध्ये कुठल्याही राज्यात आरक्षण द्यायचे  झाल्यास, तो अधिकार केवळ संसदेला आहे. म्हणजेच बील पास करून कायदा करावा लागेल. त्यामुळेच संविधानामध्ये संशोधन करून पुन्हा राज्याला अधिकार बहाल करावे.
येत्या २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाला आलेली स्थगिती, उठवण्याच्या संदर्भात जेव्हा चर्चा होईल, तेव्हा हा प्रश्न उपस्थित होईलच आणि याच वेळेस जर हे सिद्ध झाले की, संविधान संशोधन कायदा १०२ नुसार राज्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते, तर सरळ सरळ मराठ्यांना दिलेले आरक्षण अवैध ठरेल आणि मराठा समाजाचे आरक्षण धोक्यात येईल.

Related Articles

Back to top button