मराठी भाषिकांनी उद्या अंगावर एकही काळा कपडा घालू नये, कर्नाटक सरकारची दमदाटी सुरुच
हसन मुश्रीफांचं चोख उत्तर
बेळगाव/दि.३१– बेळगावात कर्नाटक सरकार आणि प्रशासनाची मराठी भाषिकांवरील दडपशाही सुरुच आहे. 1 नोव्हेंबर रोजी कर्नाटकात राज्योत्सव दिन साजरा केला जातो, तर महाराष्ट्र एकीकरण समिती त्या दिवशी अन्यायाने मराठी भाषिक प्रदेश कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ काळा दिन पाळते. मात्र यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतेही परवानगी नाकारली आहे. कर्नाटक सरकारची मराठी भाषिक बांधवांवर दमदाटी सुरुच आहे. मराठी भाषिकांनी उद्या अंगावर एकही काळा कपडा घालू नये, असं फर्मान कर्नाटक सरकारनं काढलं आहे. तर बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असून सूर्य, चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असं वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव येथे केलं आहे.
महाराष्ट्रात कोण काही म्हणतंय म्हणून काय होत नाही. मुंबईत बसून बोलू नये त्यांनी बेळगावात आमच्या भूमीत येऊन बोलावं. त्याला आम्ही चोख उत्तर देऊ असं आव्हानही सवदी यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. महाराष्ट्रात काळा दिन पाळण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांनी काळ्या दिनाबाबत केलेल्या विधानाविषयी सवदी यांना कन्नड पत्रकारांनी विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याने बेळगावमध्ये विधी मंडळाची सुवर्ण सौध ही इमारत उभारून तेथे अधिवेशन घेण्यात येते .महाराष्ट्राच्या नेते मंडळींनी काही विधाने केली तर फरक पडत नाही असेही सवदी म्हणाले.
सवदी यांच्या वक्तव्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चोख उत्तर दिलं आहे. चंद्र-सूर्य नाही तर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावरून खाली होण्याआधी बेळगाव महाराष्ट्रात घेऊ असं प्रति आव्हान हसन मुश्रीफ यांनी सवदी यांना दिलंय.
कर्नाटक पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने सायकल फेरी होणार नाही. केवळ निवडक कार्यकर्ते मराठा मंदिराच्या आवारात धरणे आंदोलन करणार आहेत. कोणतीही फेरी, मोर्चा काढायला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. 1956 साली राज्य पुनर्रचना झाल्यापासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळत असून त्या दिवशी मराठी भाषिक फेरी काढतात. यावर्षी देखील फेरीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी फेरीसाठी परवानगी देण्याची मागणी करून निवेदन दिले होते.