मराठी

कोरोना चाचण्यांचे कमाल दर निश्चित

खासगी प्रयोगशाळांनी जादा दर आकारल्यास कारवाई -जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 13 : खासगी प्रयोगशाळांनी  कोरोना चाचण्यांसाठी शासनाने निश्चित करून दिलेल्या दरानुसारच आकारणी करावी. जादा दर आकारल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिला आहे.
खासगी प्रयोगशाळांनी कोविड-19 साठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने मान्यता प्रदान केलेल्या उत्पादकांच्या रॅपिड एन्टीबॉडी टेस्ट व रॅपिड एन्टीजन टेस्ट वापरणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, शासनाने निश्चित करून दिलेल्या कमाल दरांपेक्षा अतिरिक्त दर आकारणी करता येणार नाही.

रॅपिड एन्टीजन टेस्टसाठी रूग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 600 रूपये, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास 700 रूपये व रूग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास 800 रूपये दर निश्चित करण्यात आले आहेत.  एलिझा फॉर अँटीबॉडीज टेस्टसाठी रूग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 450 रूपये, तपासणी केंद्रावरून अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास 500 रूपये व रूग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास 600 रूपये, तर सीएलआयए फॉर अँटीबॉडीज टेस्टसाठी स्वत: प्रयोगशाळेत गेल्यास 500 रूपये, तपासणी केंद्रावरून नमुने घेतल्यास 600 रूपये व घरी जाऊन नमुने घेतल्यास 700 रूपये दर निश्चित आहेत.

आरटीपीसीआर तपासण्यांचेही दर कमी

मिशन बिगिन अगेनअंतर्गत लॉकडाऊनमध्ये शिथीलता आल्यानंतर तपासणीसाठी लागणारे रिएजंट्स, व्हीटीएम कीट्स, पीपीई कीट्सची उपलब्धता वाढल्याने आरटीपीसीआर चाचण्यांचे दरही कमी झाले आहेत. त्यामुळे तपासणीच्या खर्चातही कपात व्हावी म्हणून शासनाने सुधारित कमाल दर निश्चित करून दिले आहेत.
त्यानुसार कलेक्शन सेंटरकडून नमुने प्राप्त झाल्यास 1900 रूपये, तपासणी केंद्रावर, क्वारंटाईन सेंटर, रूग्णालये आदी ठिकाणी जाऊन नमुने घ्यावे लागल्यास 2200 रूपये, रूग्णाच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास अडीच हजार रूपये असे सुधारित दर निश्चित करण्यात आले आहेत.
कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला साथरोग अधिनियमानुसार सक्षम प्राधिका-याने निश्चित करून दिलेल्या या सुधारित कमाल मर्यादेपेक्षा अधिक दर आकारता येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button