मराठी

महापौर चेतन गावंडे यांनी घेतला मालमत्‍ता कर वसुलीचा आढावा

अमरावती दि २३ – महापौर चेतन गावंडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज दिनांक 23 ऑक्‍टोंबर 2020 रोजी मालमत्‍ता कर वसुलीचा आढावा या बैठकीत घेण्‍यात आला. आता पर्यंत 10.39 टक्‍के मालमत्‍ता कर वसुल करण्‍यात आला आहे. महापौर चेतन गावंडे यांनी मालमत्‍ता कर वसुली अजुन गतीमान करावी असे निर्देश दिले. दररोज वसुलीची माहिती सहाय्यक आयुक्‍तांनी संकलित करुन तसा अहवाल त्‍वरीत सादर करण्‍याचे महापौरांनी निर्देश दिले. महापौरांनी या बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्‍तांना मालमत्‍ता कर वसुलीची गती वाढवून मालमत्‍ता कराची टक्‍केवारी वाढवावी.
सदर बैठकीमध्‍ये महानगरपालिकेचे मालमत्‍ता करापासुन उत्‍पन्‍न कशा पध्‍दतीने वाढवता येईल याबाबत चर्चा करण्‍यात आली. मालमत्‍ता कराचे वसुली करीता प्रत्‍येक प्रभागामध्‍ये वसुली लिपीकांनी आपले स्‍थळ निश्चित करावे व तेथे ठराविक वेळेमध्‍ये उपस्थित राहण्‍यासंदर्भात सुचित करावे. वसुलीचे स्‍थळ निश्चिती करतांना महानगरपालिकेचे शाळा, दवाखाने, इत्‍यादींची निवड करण्‍यात यावी. वसुलीकरीता ऑनलाईन पेमेंट गेटवे प्रणाली तयार करुन कोणत्‍याही बँकेच्‍या माध्‍यमातुन ऑनलाईन पध्‍दतीने कर वसुल सहज व यशस्‍वीरित्‍या साध्‍य होईल याकरीता प्रयत्‍न करावे.
अद्यापपावेतो कर निर्धारण न झालेल्‍या इमारती किंवा इमारतीचे भाग यावर मालमत्‍ता कर आकारणीची कार्यवाही करण्‍यात यावी. मालमत्‍ता सर्व्‍हे व कर आकारणीचे कार्यवाही करीता वार्डनिहाय तीन-चार कर्मचा-यांचे पथक तयार करण्‍यात यावे या प‍थकामध्‍ये वसुली लिपीक, कर निरीक्षक, कनिष्‍ठ अभियंता इत्‍यादींचा समावेश करण्‍यात यावा असेही निर्देशित करण्‍यात आले.
नव्‍याने कर निर्धारण आलेल्‍या मालमत्‍ता पैकी 10 टक्‍के मालमत्‍तांनी पुनः तपासणी कर निरीक्षक यांनी करावी, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी यांनी 2 टक्‍के मालमत्‍तांचे पुनःतपासणी करावी तसेच सहाय्यक आयुक्‍त यांनी 1 टक्‍के मालमत्‍तांची पुनः तपासणी करावी.
इमारतीमध्‍ये अतिरिक्‍त बांधकाम करण्‍यात आले असेल, वापरामध्‍ये बदल झालेला असेल, त्‍या इमारतीस पुनः कर आकारणी करण्‍याची कार्यवाही करावी. मालमत्‍ता कराची वसुली सोबतच कराचे मागणीमध्‍ये वाढ करण्‍यासंदर्भात ठोस प्रयत्‍न करण्‍यात यावे. शहरामध्‍ये बरेच वर्षापासून असलेल्‍या झोपडपट्टी मधील मालमत्‍तांना मालमत्‍ता कर आकारणीचे कक्षेत घेण्‍यासंदर्भात कार्यवाही करण्‍यात यावी.
यावेळी उपमहापौर कुसुम साहु, स्‍थायी समिती सभापती राधा कुरील, मनपा आयुक्‍त प्रशांत रोडे, सभागृह नेता सुनिल काळे, माजी स्‍थायी समिती सभापती तुषार भारतीय, कर मुल्‍य निर्धारण अधिकारी महेश देशमुख, सहाय्यक आयुक्‍त (मुख्‍यालय) नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, अमित डेंगरे, विशाखा मोटघरे, तौसिफ काझी, सहाय्यक क्षेत्रीय अधिकारी संजय गंगात्रे, बि.एन. जोगी, राजेश चिंचमालातपुरे, जितेंद्र श्रीवास्‍तव, नरेंद्र देवरणकर उपस्थित होते.

Related Articles

Back to top button