मराठी

‘मनरेगा’त स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी सूक्ष्म नियोजन व लेबर बजेट

अमरावती, दि. २ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये (मनरेगा) स्थानिक पातळीवर अधिकाधिक रोजगारनिर्मितीसाठी  रोहयो विभागाकडून सूक्ष्म नियोजन व लेबर बजेट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातही अकुशल मजूर बांधवांना रोजगार मिळवून देण्यासाठी गावपातळीवरील कामाची गरज, त्यातून विविध विकासकामांना चालना यांचा सर्वंकष विचार करून सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
ग्रामीण भागात कामाच्या शोधात असलेल्या अकुशल मजूर बांधवांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यांना सूक्ष्म नियोजन करण्याच्या रोहयो विभागाच्या सूचना आहेत. रोजगार उपलब्ध करून देताना त्यातून शाश्वत व उत्पादक स्वरूपाची मत्ता निर्माण करणे देखील अपेक्षित आहे. या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना नियोजन व लेबर बजेट तयार करण्यास अनन्यसाधारण महत्त्व देणे अपेक्षित आहे. त्यानुसार जिल्ह्यातही सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.  गाव पातळीवर ग्रामपंचायत मध्ये किती मजुरांना कामाची आवश्यकता आहे, किती दिवस कामाची आवश्यकता आहे व अशा मजुरांना मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून देताना त्यातून कोणत्या मत्ता निर्माण करता येतील या बाबीचे सूक्ष्म नियोजन करणे शासनाकडून अनिवार्य  करण्यात आले आहे.
यंदा कोरोना संकटकाळात लॉकडाऊन व इतर विविध कारणांमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेली कामाची गरज लक्षात घेऊन अमरावती जिल्ह्यात प्राधान्याने जलसंधारण, रस्तेविकास आदी विविध विकासकामे राबविण्यात आली. या कामांमध्ये अमरावती जिल्हा राज्यात सुरुवातीपासून आघाडीवर राहिला. यापुढेही मनरेगातून स्थानिक पातळीवर अधिकाधिक रोजगारनिर्मिती करत विकासकामांना चालना देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.
रोजगारनिर्मिती करताना कंपार्टमेंट बंडींग, चेक डॅम, कंटूर बंडींग, गॅबीयन बंधारे, भूमिगत बंधारे, शेततळे, वैयक्तिक लाभाच्या सिंचन विहिरी, सामूहिक विहिरी, रेशीम लागवड, फळबाग लागवड, नर्सरी, कंपोस्ट पीट, व्हर्मी कंपोस्ट, नाडेप, जनावरांचे गोठे, वृक्ष लागवड, सामूहिक वृक्ष लागवड, वैयक्तिक वृक्ष लागवड प्रामुख्याने महोगनी वृक्ष लागवड, बारमाही रस्ते, पेव्हर ब्लॉक, क्राँकीट रोड, बाजार तळ, खेळाची मैदाने तयार करणे, त्यांची दुरुस्ती करणे, धान्य गोदाम, अंगणवाडी, ग्रामपंचायत भवन, छोटे पाझर तलाव, स्मशानभुमी शेड, छोटे पूल, शौचालयाचे बांधकाम, शाळेसाठी कंपाऊंड वॉल, छतावरील पाण्याचे पुनर्भरण, इमारत दुरुस्ती कामे असे करताना पुरेशा प्रमाणात कामे सुचवणे जेणेकरून या कामाचा समावेश वार्षिक कृती आराखड्यात तसेच लेबर बजेटमध्ये करता येऊ शकेल व कामे कार्यान्वित करताना पुढे तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाही. यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

Back to top button