आमदार देवेंद्र भुयारांनी घेतली तालुक्यातील प्रशासकांची बैठक
जनतेला विश्वासात घेऊन कामे करण्याचे दिले निर्देश
वरुड/दि.१० – मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी तालुक्यातील ग्रामपंचायत प्रशासकांची आढावा बैठक नुकतीच घेतली. आमदार देवेंद्र भुयार यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात महसूल विभागाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासक यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
१५५ अन्वये सातबारा, फेरफार दुरुस्तीचे सर्व प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात यावे, गावक:यांना विश्वासात घेऊन १५ वित्त आयोगाचे काम करण्याबाबत प्रशासकांना निर्देश देण्यात आले. भापकी पुनर्वसन संदर्भात मोजणी अगोदर साफसफाई, मतदारसंघातील तीर्थक्षेत्र देखभाल व दुरुस्ती तसेच गरजुंनाच घरकुल नियमानुकुल करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले. राजीव गांधी भवन, वाचनालय, ग्रामपंचायत भवन, महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत येणारे विषया संदर्भात आढावा घेण्यात आला .
गावातील रस्ते , पाणी यासह अन्य कामे हाती घेऊन गावांचा विकास करावा. अधिका:यांनी लक्ष देऊन काम केले पाहिजे. सर्व कामे वैज्ञानिक दृष्टिकोनातुन योग्य असायला हवीत. त्यामध्ये भेदभाव नको, जनतेला विश्वासात घेऊन कामे करावीत. अशा सूचना आमदार देवेंद्र यांनी केल्या.
यावेळी आमदार देवेंद्र्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील गावातील विकास कार्याचा प्रगती आढावा, गावातील पर्यावरण वाचवणे तसेच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. आढावा बैठकीला तहसिलदार किशोर गावंडे, पं.स.गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद उर्फ बाळु कोहळे पाटील, जि.प.सदस्य राजेंद्र बहरुपी, राजेंद्र पाटील, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, उपसभापती चंद्रशेखर अळसपुरे, गोपाल सोरगे, पं.स.सदस्य तुषार निकम, ललिता लांडगे, नगरसेवक महेंद्र देशमुख, संदीप खडसे, ऋषिकेश राऊत, प्रभाकर काळे, निखिल बनसोड, गौरव गणोरकर, अक्षय डांगोरकर यांचेसह आदी उपस्थित होते.