ठाणेदाराच्या निलंबनाकरिता आमदारांचा हटयोग
अकोला/दि.४ – हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जयहिंद चौक येथे जाळून निषेध व्यक्त केला. यावेळी वाहतूक खोळंबली होती. आंदोलनकर्त्यांना रस्ता मोकळा करण्याकरिता सांगताना ठाणेदार प्रकाश पवार आणि शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये शाब्दिक चकमक झाली आणि नंतर या आमदारांनी ठाणेदार प्रकाश पवार यांच्या निलंबनाची मागणी करीत तेथेच ठिय्या दिला. यावेळी आमदार गोपीकिसन बाजोरिया, आमदार नितीन देशमुख यांच्याशी चर्चा करण्याकरिता पोलिस अधीक्षक श्रीधर जी. पोहोचले होते. मात्र या आमदारांचा निलंबनासाठीचा हटयोग कायम होता.
शिवसेनेचे पश्चिम अकोला शहर प्रमुख नगरसेवक राजेश मिश्रा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रतिकात्मक जयहिंद चौक येथे पुतळा जाळला. यावेळी जिल्हा प्रमुख तथा आमदार नितीन देशमुख, आमदार गोपीकिसन बाजोरिया उपस्थित होते. उत्तरप्रदेशातील हाथरसमधील घटना आणि माध्यमांच्या मुस्कटदाबी विरोधात शिवसेनेने हा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
यावेळी शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलना दरम्यान रस्त्यावरील वाहतूक खोळंबल्याने आंदोलकांची गर्दी कमी करण्याबाबत जुने शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश पवार यांच्याशी आमदार नितीन देशमुख आणि आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला. त्यावेळी काही शिवसैनिक पोलिसांवर धावून गेल्याचे काहींनी सांगितले. यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. यानंतर हे प्रकरण चिघळले.आंदोलनानंतर वृत्तलिहिस्तोवर शिवसेनेचे आमदारांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू होते. ठाणेदार पवार यांच्या निलंबनाची मागणी शिवसैनिकांनी केली आहे