नांदेड/दि.१६– अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मनसेच्या किनवट शहराध्यक्ष सुनील ईरावार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. सुनील ईरावार हे नांदेड जिल्ह्यातील किनवट शहराध्यक्ष आहेत. आर्थिक अडचणींमुळे राहत्या घरात आत्महत्या केल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. राजकारणात जात आणि पैसे दोन्ही गोष्टी लागतात, माझ्याकडे यापैकी काहीच नाही असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
रविवारी सकाळी सुनील ईरावार यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जातीपातीचं राजकारण आणि आर्थिक उलाढाल या राजकारणात सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांची गोची होत असल्याचं या प्रकरणातून समोर आलं आहे. सुनील याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, अखेरचा जय महाराष्ट्र, राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाही.जय महाराष्ट्र..जय राज साहेब..जय मनसे अशी सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या केली आहे. तसेच या पुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी, छोटी वहिनी, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही, तरी पण तुम्ही सर्वजण मला माफ कराल अशी अपेक्षा आहे असं या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
मात्र शहराध्यक्ष सुनील ईरावार यांच्या आत्महत्येने कार्यकर्त्यामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.सध्या राजकारणात घराणेशाही बरोबरच धनदांडग्या लोकांचीच अधिक गर्दी आहे. पैसा, जात या समीकरणात आपला टिकाव लागत नसल्याने राजकारणात हताश झालेल्या सुनील ईरावार यांनी घेतलेले टोकाचं पाऊल नक्कीच राजकीय नेत्यांना आत्मपरिक्षण करायला लावण्यासारखं आहे. सुनील हा अत्यंत मनमिळाऊ, कुशाग्र बुद्धी,व अत्यंत संयमी होता असं कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.