मराठी

बँकांऐवजी बाजारातच फिरतो पैसा

डिजिटल व्यवहाराचे तीन तेरा

मुंबई/दि.२२ – नोटाबंदीनंतर रोख व्यवहार कमी होऊन डिजिटल व्यवहार वाढतील, अशी सरकारची अपेक्षा होती; परंतु ही अपेक्षा दिवसेंदिवस फोल ठरताना दिसते आहे. रोख व्यवहार कमी करण्याचेउद्दिष्ट होते. प्रत्यक्षात नोटाबंदीनंतरच्या प्रत्येक वर्षात नोटा वाढतच आहेत. बँकांऐवजी बाजारातच पैसा फिरतोआहे. डिजिटल व्यवहारांचाही फज्जा उडाला. कोरोनाकाळात तर गेल्या चार वर्षांपेक्षा सर्वाधिक नोटा चलनात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदी जाहीर केली, तेव्हापासून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. यानंतर डिजिटल व्यवहारांसाठी सरकार आग्रही होते. ऑनलाइन पेमेंट सोपे करणारेअनेक मार्ग सुरू झाले. मार्च 2020 पर्यंत यात वाढही सुरू होती; मात्र एप्रिल 2020 पासून यात मोठी घट सुरू झाली. रोख व्यवहारांकडे ओढा वाढल्याचे रिझर्व्ह बँकेच्या रिझर्व्ह मनी कंपोनंट अँड सोर्स’ या जानेवारीच्या अहवालातून समोर आले आहे.
कोरोनाकाळात बाजारपेठा बंद होत्या. मोठ्या प्रमाणात ई-पोर्टलवर खरेदी झाली. नोटांना स्पर्श टाळण्यासाठी अधिकाधिक ऑनलाइन व्यवहार झाल्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. 23 मार्च 2020 ला टाळेबंदी जाहीर झाली, त्या वेळी 24.39 लाख कोटी चलन बाजारात होते. यापैकी 23.41 लाख कोटी (96 टक्के) नागरिकांच्या हातात (करन्सी विथ पब्लिक) तर उर्वरित 97.5 हजार कोटी बँकांत जमा (करन्सी विथ बँक्स) होते. 18 डिसेंबर 2020 रोजी नागरिकांच्या हातात एकूण चलनाच्या 96.58 टक्के नोटा होत्या. मार्चनंतर चलनी नोटा तर वाढल्याच, शिवाय बँकेऐवजी घरातच पैसा साचवण्याची प्रवृत्ती आली.
अहवालानुसार 31 डिसेंबर 2020 रोजी बाजारात 27.7 लाख कोटी मूल्यांच्या नोटा चलनात होत्या. डिसेंबर 2019 मध्ये ही संख्या 22.7 लाख कोटींच्या नोटांएवढी होती. वर्षभरात पाच लाख कोटी म्हणजेच 22 टक्क्यांनी नोटा चलनात वाढल्या. नोटाबंदीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात चलनी नोटा बाजारात आल्या. मार्च 2020 पासून सुरू असलेल्या टाळेबंदीमध्येनगदी व्यवहार वाढल्याचेहे द्योतक आहे.

Related Articles

Back to top button